

पाथर्डी: शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक भागांमध्ये तब्बल आठ दिवसांपासून नळांना पाणी न आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळ्याची तीव्रता, सुट्टीसाठी आलेले पाहुणे, वाढलेली पाण्याची गरज, सुरू होणारा पुरुषोत्तम मास, धार्मिक कार्यक्रम आणि विवाह सोहळे, यामुळे पाण्याची मागणी वाढली असताना नागरिकांना विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. पालिका प्रशासनाकडून मात्र पाईपलाईन फुटली किंवा वीज नसल्याने पाणीपुरवठा झाला नाही, अशी ठरलेली कारणे दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आठ दिवसांतून केवळ एकदाच पाणीपुरवठा होत असताना वर्षभराची पूर्ण पाणीपट्टी कशाच्या आधारावर घेतली जाते, असा सवाल नळधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरातील म्हस्के कॉलनी, पसायदान कॉलनी, कसबा विभागातील काही भाग, तसेच उपनगरांतील परिसरात जाणीवपूर्वक पाणीपुरवठ्यात दिरंगाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही भागांत रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसते, तर काही भागांत नागरिकांना थोड्याच वेळासाठी अपुरा पाणीपुरवठा केला जात असल्याने संताप वाढत आहे. ज्या भागात लोकप्रतिनिधी सक्रिय आहेत, तेथे नियमित व भरपूर पाणी मिळते. मात्र, इतर भागांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. विकासाच्या घोषणा करणाऱ्यांनी किमान नागरिकांना वेळेवर पाणी द्यावे, अशी भावना उपनगरातील रहिवाशांनी व्यक्त केली. पाणीप्रश्न तातडीने न सुटल्यास पालिका कार्यालयावर महिलांसह नागरिकांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. लाखो रुपयांची पाणीपट्टी वसूल करणाऱ्या पालिकेने किमान नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. उन्हाळ्यात आठ दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत असेल तर पाणीपट्टीत सवलत द्यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
सातशे लिटर पाण्यासाठी तीनशे रुपये
नागरिकांना 700 लिटर पाण्यासाठी तब्बल 300 रुपये मोजावे लागत आहेत. पाणी विकत घेण्यासाठी खर्च होणारी रक्कम पाणीपट्टीतून कमी केली जाणार का, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करीत आहेत. पालिका कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक मिळत असल्याचाही आरोप करण्यात आला. पाणी वरून आले तर देऊ, नाहीतर कुठून देणार? अशी उत्तरे दिली जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
शेवगाव शहरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना तब्बल 16 दिवसांनी पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एका बाजूला नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसताना दुसऱ्या बाजूला शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकावर लावलेली झाडेही पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शहरातील अनेक भागांत नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना तसेच लहान मुलांना दूरवरून पाणी आणावे लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे स्वच्छतेच्या समस्या देखील दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. दरम्यान, शहर सुशोभीकरणासाठी मुख्य रस्त्यांच्या दुभाजकावर लावलेली झाडेही पाण्याअभावी कोमेजून गेली आहेत. अनेक ठिकाणी झाडांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने ती सुकत आहेत.
विशेष म्हणजे या झाडांसाठी एक टँकर पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. शासनाकडून वृक्षलागवडीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, लागवडीनंतर झाडांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधी मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. ज्वलंत प्रश्नावर मूग गिळून गप्प आहेत.
पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागत असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. दुसरीकडे, शहरातील झाडेही पाण्याअभावी सुकली आहेत. पर्यावरण टिकवण्यासाठी लावलेली झाडे जपणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा व्यवस्था किंवा टँकरची सोय तातडीने करील.
दत्तात्रय फुंदे, जिल्हा उपाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना