

कर्जत: तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उष्णतेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून तापमानाचा पारा तब्बल 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. कडक उन्हामुळे विहिरी, तलाव, ओढे तसेच छोटे जलसाठे कोरडे पडू लागल्याने ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत असून प्रशासनालाही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.
पंचायत समिती कर्जतच्या टंचाई विभागामार्फत सध्या तालुक्यातील विविध गावांमध्ये 7 टँकरच्या माध्यमातून दररोज सुमारे 1 लाख 90 हजार लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार 16 मे 2026 रोजी मुळेवाडी, डिकसळ, कापरेवाडी, खांडवी, पिंपळवंडी, घालवडी, राक्षसवाडी खुर्द, सोनाळवाडी तसेच कौडाणे या गावांमध्ये व या गावाच्या परिसरात असणाऱ्या 64 वाड्या वस्त्या या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. या गावांतील अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये विहिरींची पाणीपातळी पूर्णपणे घटल्याने नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीनुसार या नऊ गावांमधील तब्बल 64 वाड्या-वस्त्यांवरील सुमारे 16 हजार 929 नागरिकांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी दररोज हजारो लिटर पाणी टँकरने पोहोचवले जात असून काही भागांमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. महिलांना व नागरिकांना पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र अनेक गावांमध्ये पाहायला मिळत आहे.
तालुक्यातील मुळेवाडी येथे चार वाड्यांसाठी 24 हजार लिटर, डिकसळ येथे सहा वाड्यांसाठी 24 हजार लिटर, कापरेवाडी येथे दहा वाड्यांसाठी 24 हजार 290 लिटर तर खांडवी गावातील सात वाड्यांसाठी 24 हजार 150 लिटर पाणीपुरवठा करण्यात आला आहे. याशिवाय पिंपळवंडी, घालवडी, राक्षस वाडी खुर्द, सोनाळवाडी आणि कौडाणे या भागांमध्येही मोठ्या प्रमाणात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळत नसल्याने अनेक ठिकाणी पिके करपू लागली असून जनावरेही पाण्याअभावी त्रस्त झाली आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रशासनाकडे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
संरक्षक कठडा बसवावा
डिकसळ गावामध्ये विहिरीमध्ये दोन टँकर दिवसभरामध्ये ओतले जातात त्यानंतर महिला त्या विहिरीमधून शेंदूननेतात. रस्त्यालगत असणाऱ्या या विहिरीभोवती संरक्षण कठडा बसवण्याची आवश्यकता आहे. महिलांना पाणी शेंदून नेताना कोणतेही संरक्षण नाही. त्यामुळे त्यांच्या जीवितास विहिरीमध्ये पडून धोका होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.