नगर तालुका: महानगरपालिकेच्या निवडणुकीत केडगावच्या बालेकिल्ल्यावर पुन्हा झेंडा फडकवण्यासाठी कोतकर गट पुर्ण ताकदीने रणागंणात उतरला आहे. महायुती होणार का, उमेदवारी कोणाला फायनल करायची यात कोतकर विरोधक गुंतलेला असताना कोतकर गटाने प्रचाराचा नारळ फोडून रणशिंग फुकंले आहे.
मागील महापालिकेच्या निवडणुकीत हातातून गेलेला केडगावचा बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी जेष्ठ नेते भानुदास कोतकर सरसावले आहेत. राजकीय परिस्थिती काय होईल, भाजप उमेदवारी देईल का याची वाट न पाहता कोतकरांनी जुन्या-नव्या समर्थकांचा ताळमेळ बसवत गुरूवारी रात्री केडगावच्या शिवाजीनगर भागात प्रचाराचा नारळ फोडला. आता समर्थकांना घेऊन हाऊस टू हाऊस प्रचार करण्याचे त्यांचे पुढील नियोजन आहे. अजुन कोणत्याच पक्षाचे उमेदवार निश्चित नसताना कोतकरांनी प्रचाराचा नारळ फोडूून मोठी खळबळ उडवून दिली आहे.
मुळचे कॉग्रेसचे असणाऱ्या भानुदास कोतकर यांनी यंदा समर्थक इच्छुकांना भाजपकडुन मैदानात उतरवण्याचे निश्चित केले आहे. त्यादृष्टीने इच्छुक उमेदवारांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाला व उमेदवारीला होणारा संभाव्य विरोध पाहता त्यांनी पक्षाच्या होकाराची वाट न पाहता संभाव्य उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचारात आघाडी घेतली आहे. केडगावमधून राष्ट्रवादी (अजित पवार) व शिवसेना (शिंदे गट) व भाजपकडून इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे. या तीनही पक्षात युती होण्याचे संकेत असले तरी अजून अंतिम निर्णय न झाल्याने कोतकर यांचे विरोधक आता पक्ष व उमेदवारी पदरात मिळवण्याच्या तयारीत आहेत. अनेक इच्छुकांना शब्द मिळाला असला तरी पक्ष निश्चित नसल्याचे पुढचे पाऊल उचलण्यात अडचणी येत असल्याचे बोलले जाते. भूषण गुंड, सागर सातपुते, सविता कराळे यांच्यासह भानुदास कोतकर यांनी वार्डात प्रचार फेऱ्या सुरू केलेल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याअगोदरच प्रचार फेऱ्या सुरू केल्याने चर्चेचा विषय ठरत आहे.
कोतकर व जगताप समर्थकच राहतील आमने सामने
विधानसभा निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांना साथ न देता त्यांच्या विरोधकांना मदत करण्याचा निर्णय कोतकर गटाने घेतल्याची चर्चा त्यावेळी होती. यामुळे आ. जगताप यांचे केडगावच्या रणागंणाकडे विशेष लक्ष असल्याची चर्चा आहे. यामुळे कोतकर -जगताप यांच्या समर्थकांमध्येच लढती होण्याचे संकेत आहेत.
कोतकरांचा ’ प्लॅन बी ’ तयार
शहरात महायुती झाली तर भाजपकडून इच्छुक असलेल्या कोतकर गटाच्या उमेदवारीचा पत्ता कट होऊ शकतो असे राजकीय विलेषक सांगत आहेत. याचा अंदाज असल्यानेच कोतकर गटाने केडगावच्या दोन प्रभागासह अन्य काही प्रभागासाठी ’ महानगर विकास आघाडी ’ करण्याचा प्लॅन बी तयार ठेवला आहे. यामुळे केडगावमध्ये तिरंगी लढत होऊ शकते.