नगर: बुद्धिबळप्रेमींसाठी आकर्षण ठरणारी शांतीकुमारजी फिरोदिया अखिल भारतीय खुली आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धा ११ नोव्हेंबर रोजी येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात होणार आहे. या स्पर्धेचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे चीनमधील बुद्धिबळ खेळणारा अत्याधुनिक रोबोट राज्यात प्रथमच अहिल्यानगरमध्ये येणार असून, हा रोबोट खेळाडूंशी प्रत्यक्ष बुद्धिबळाचा डाव खेळणार आहे.
अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी या स्पर्धेची माहिती दिली. स्पर्धेत गुजरात, आंध्र प्रदेश, गोवा, तमिळनाडू, तेलंगणा अशा विविध राज्यांतील दोनशेहून अधिक खेळाडूंनी प्रवेश निश्चित केल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. या स्पर्धेचे विशेष आकर्षण असलेला चीनमधून येणारा बुद्धिबळ यंत्रमानव खेळाडूंशी प्रत्यक्ष बुद्धिबळ खेळणार आहे. नगरमधील तसेच बाहेरगावच्या खेळाडूंना या रोबोटसोबत डाव खेळण्याची संधी मिळणार असून, बुद्धिबळ खेळाडू, पालक आणि प्रशिक्षकांसाठीही हा अनुभव विशेष ठरणार आहे, अशी माहिती संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी दिली.
या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या साडेचार वर्षांचा बालखेळाडू ते ८७ वर्षांचे ज्येष्ठ खेळाडू अशा विविध वयोगटांतील बुद्धिबळपटू या यात कौशल्य पणाला लावणार आहेत. बुधवारी (११ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे. स्पर्धेत एकूण नऊ फेऱ्या होतील. रविवारी (दि. १५) दुपारी ३ वाजता बक्षीस वितरण होईल. स्पर्धेतील विविध गटांमध्ये एकूण पाच लाख रुपयांची प्रोत्साहनपर रोख पारितोषिके, आकर्षक ७० करंडक, तसेच सहभागी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे १०० लाकडी बुद्धिबळ पट आणि सोंगट्यांचा वापर हेही या स्पर्धेचे वैशिष्ट्य असेल. अशा प्रकारचे १०० आंतरराष्ट्रीय दर्जाचे लाकडी बुद्धिबळ पट भारतात केवळ अहिल्यानगर येथेच वापरले जात असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून प्रवीण ठाकरे (जळगाव) काम पाहणार असून, पवन राठी (पुणे), शार्दुल टापसे (सातारा), दीपक चव्हाण (वाशिम), शिशिर इंदुरकर (नागपूर), प्रशांत धंगेकर आणि देवेंद्र ढोकळे (अहिल्यानगर) हे सहाय्यक पंच म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
ही स्पर्धा जागतिक बुद्धिबळ संघटना (FIDE) आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या नियमावलीनुसार पार पडणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनसह जिल्हा बुद्धिबळ संघटना प्रयत्नशील आहे. अहिल्यानगर शहरातील बुद्धिबळप्रेमी, खेळाडू आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी यशवंत बापट (९३२६०९२५०१) आणि परूनाथ ढोकळे (९८५०७०४२६८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.