

नगर: मोठ्या जोशात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरले पण अखेरच्या टप्प्यात मात्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यावर तलवार म्यान करण्याची वेळ ओढावली. निवडणुकीच्या युद्धात सभापतींचा एक मोहरा मात्र विजयाच्या रेषेपार पोहचला. दुसरा विजयासाठी झुंजत असतानाच दोघांनी अचानकपणे रणभूमीतून काढता पाय घेतला.
सहकारातील दिग्गजांच्या गाठीभेटी घेत सभापती शिंदे हे जिल्हा बँकेवर वर्चस्वाचे डाव टाकत होते. त्याच वेळी विखे-थोरात एकत्र येण्याचे घाटत होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख युतीवर शिक्कामोर्तब होताच सभापती शिंदे यांनी सहकाराच्या दिग्गजांसोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्याचा यांनी प्लॅन बी पुढे आणला. सहकारातील दिग्गजांच्या पॅनलमध्ये स्थान मिळेल असे वाटत असतानाच त्या शक्यतेला बगल दिली गेली. चिन्ह वाटपात तरी न्याय मिळेल या आशेवरही पाणी फेरले.
सहकाराच्या रणांगणात हार न मानता सभापती प्रा. राम शिंदे यांनी चौघांना मैदानात उतरवले. जामखेडमधून सचिन घुमरे, कर्जतमधून ज्योती प्रकाश शिंदे, ओबीसीतून अजिनाथ हजारे व महिला राखीव जागेवर मंजूषा गुंड यांची उमेदवारी सभापती शिंदे यांच्याकडून जाहीर केली गेली. सभापती शिंदे यांच्या सहकारातील आवक्याचा आदमास तोपर्यंत विखे-थोरात-गडाख युतीने घेतला होता. त्यामुळे जामखेडमधील माघारीने सभापती शिंदेंचे सचिन घुमरे बिनविरोध झाले. सभापती शिंदेचे तीन मोहरे रणांगणात एकाकी पडले तरी लढण्याच्या इराद्याने पळत होते. मात्र पळता पळताच त्यातील दोघांची दमछाक झाली.
‘सहकार विकास मंडळा’पुढे तग धरणे शक्य नसल्याची जाण होताच ओबीसीतून अजिनाथ हजारे व महिला राखीवमधून मंजूषा गुंड यांनी अचानकपणे माघार घेण्याचा निर्णय घेतला. अर्थात माघारीचा निर्णय म्हणजे मतपत्रिकेवरून नाव हटवणे नव्हे तर प्रचार न करण्याचा निर्णय. सभापती शिंदे यांचे बँकेच्या रणांगणातून दोन मोती गळाले असले तरी एक मोहरा मात्र झुंजताना दिसत आहे.
निर्णय शिंदेशी सल्लामसलत करून?
मंजूषा गुंड या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तर अजिनाथ हजारे यांचा बँकिंग क्षेत्रात मोठा नावलौकिक आहे. सेनापतीकडून अपेक्षित रसद मिळत नसल्याची आणि विरोधकांशी सामना करताना येणाऱ्या मर्यादा लक्षात घेता गुंड व हजारे यांनी स्वत:हून थांबण्याचा घेतलेला निर्णय सभापती शिंदेशी सल्लामसलत करून की कसे? हे मात्र अजून समोर येणे बाकी आहे. दोघांच्या माघारीने प्रा. राम शिंदे यांचा जिल्हा बँकेतील ‘निर्णायक’ घडामोडीला बायबाय केल्याचे मानले जाते. तर दुसऱ्या बाजूला आता खा. नीलेश लंके एकाकी पडल्याचेही मानले जाते.
ओबीसी मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. सुरुवातीपासूनच शिंदे-विखे-थोरात पॅनलमधून उमेदवारी मिळेल, असे चित्र होते. मात्र शेवटच्या टप्प्यात तसे झाले नाही. निवडणूक लढवावीच, यासाठी जवळच्या लोकांचे फोन सुरू आहेत. संबंधित लोकं विचारत आहेत. मात्र, आपण थांबण्याचा निर्णय घेतला आहे. मला कोणीही मतदान करू नये, असे मी जाहीर आवाहन केले आहे. मात्र, पाठिंबा कोणालाही दिलेला नाही.
आजिनाथ हजारे, उमेदवार
विखे-थोरातांच्या पॅनलमध्ये प्रा. शिंदे हेही होते. त्यामुळेच महिला राखीव मतदारसंघातून पत्नीचा उमेदवारी अर्ज भरला होता. माघारीनंतरही विखे-थोरातांचे काही अर्ज राहिले होते, मात्र, तुम्हाला पॅनलमध्ये घेणार असल्याचे प्रा. शिंदेंना सांगण्यात आले होते. अर्ज काढू नका, असाही निरोप होता. परंतु प्रत्यक्षात पॅनलमध्ये उमेदवारी दिलीच नाही. त्यामुळे अर्ज राहिला. आता आम्ही माघार घेत आहोत. कोणाला पाठिंबा दिलेला नाही.
राजेंद्र गुंड, कर्जत