नगर: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लागू केलेल्या १० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर पाणी गळती रोखण्याचा व अनधिकृत नळकनेक्शन शोधून कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी 'अभय योजना' राबविण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजनासंदर्भात महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त यशवंत डांगे, नगरसेवक संपत बारस्कर, निखील वारे, अविनाश घुले, बाबासाहेब वाकळे, सागर बोरूडे, मनोज कोतकर, अमोल येवले, नगरसेविका गीतांजली काळे आदी उपस्थित होते.
शहरात दीड लाख मालमत्ता असताना केवळ ७० हजारच अधिकृत नळ कनेक्शन आहेत. अनेक ठिकाणी अनधिकृत नळकनेक्शन असल्याचा आरोप नगरसेवक निखील वारे यांनी केले. अनधिकृत कनेक्शन अधिकृत करण्यासाठी आयुक्त यशवंत डांगे यांनी 'अभय योजना' जाहीर केली असून, त्यानंतरही कनेक्शन नियमित न करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.
काही भागांत दररोज तर काही ठिकाणी आठ दिवसांनी पाणी येते. हा असमतोल दूर करून गळती रोखणे, नळांना तोट्या बसवणे आणि प्रभागनिहाय स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. तसेच वॉशिंग सेंटर व स्विमिंग टँकबाबत पुढील महिन्यात निर्णय घेतला जाईल.
ग्रामीण भागात महापालिकेचे टँकर पाठवण्याची मागणी नगरसेवक संपत बारस्कर यांनी केली होती. मात्र, शहराकडेच पुरेसे पाणी नसल्याने ग्रामीण भागात टँकर देता येणार नाहीत; ग्रामपंचायतींनी पिंपळगाव माळवी तलावातून पाणी घ्यावे, अशी स्पष्ट भूमिका आयुक्त डांगे यांनी मांडली.
ग्रामपंचायतींना दिले जाणारे पाणी थांबवण्याची आणि 'फेज टू' योजनेची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी नगरसेवक निखील वारे यांनी केली. तर नगरसेवक अविनाश घुले यांनी पाणी बचत जनजागृती व दुष्काळी आराखडा तयार करण्याची, अमोल येवले यांनी हॉटेल्सच्या नळ तपासणीची आणि पुष्कर कुलकर्णी यांनी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी लावून धरली.
५०० कोटींचा पाणीपुरवठा आराखडा
पुढील ३० वर्षांचे नियोजन करून ५०० कोटी रुपयांचा डीपीआर शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. यामध्ये मुळा धरणातून नवीन पाइपलाइन, अंतर्गत वितरण सुधारणा आणि १० नवीन पाण्याच्या टाक्यांचा समावेश असल्याची माहिती पाणीपुरवठा अधिकारी गणेश गाडळकर यांनी दिली.
टँकरसाठी राट्रवादीच्या नगरसेवकांचे मानधन
नगरसेवक संपत बारस्कर म्हणाले, जिथे पाण्याची आवश्यकता आहे, तिथे पाणी देणे हे आपले कर्तव्य आहे. ग्रामीण भागात महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन टँकरच्या उपाययोजनांसाठी द्यावे.