Chakhale Wadi Water Shortage: गावात पाणी असूनही चखालेवाडीत पाणीटंचाई; ८५ वर्षांच्या ज्येष्ठांनाही पाण्यासाठी संघर्ष

निकृष्ट पाणीपुरवठा योजनेविरोधात ग्रामस्थांचे आमरण उपोषण; विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
Chakhale Wadi Water Shortage
Chakhale Wadi Water ShortagePudhari
Published on: 
Updated on: 

कर्जत: गावाच्या परिसरात पाणी उपलब्ध असतानाही निकृष्ट पाणी योजनेच्या कामामुळे चखालेवाडी ग्रामस्थांना दरवर्षी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः वृद्ध नागरिकांची पाण्यासाठी मोठी परवड होत असून, ८५ वर्षे वय होत आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही पाणी आणण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पाणीटंचाईसह गावातील प्रलंबित विकासकामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाचा मंगळवारी (दि. १७) दुसरा दिवस असूनही मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

Chakhale Wadi Water Shortage
Ahilyanagar Municipal Corporation: नगर महापालिकेच्या न्यायालयीन विभागावर नगरसेवकांचा संताप; पॅनलवरील वकिलांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

या आंदोलनात अतुल सुरभुरे, लहू खटके, राहुल चखाले, वैभव बुरंगे, बाळासाहेब गाढवे, उत्तम शिंगाडे, भीमराव खटके, राहुल गाढवे, भाऊसाहेब खटके, अक्षय मेरगळ, राहुल रांधवन, अमोल गाढवे, अमोल खटके, रोहित खटके, बापू गाढवे, प्रकाश खटके, सोपान शिंगाडे, सोपान माळशिकारे, रोहित माळशिकारे, विजय सुरभुरे आणि तुषार रांधवन यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

Chakhale Wadi Water Shortage
Nagar Leopard News नगर शहरात बिबट्याची दहशत; महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वावर

गावात पाण्याचे स्रोत आणि परिसरात पाणी उपलब्ध असतानाही पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. योजनेवर खर्च होऊनही नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहते. महिलांसह वृद्धांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. वयोवृद्धांना पाण्याचे हंडे आणणेही अशक्य होत असताना प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Chakhale Wadi Water Shortage
Harishchandragad Kokan Kada: हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा बनतोय आत्महत्यांचे केंद्र; वर्षभरात सहा पर्यटकांचा मृत्यू

अधिकाऱ्यांचे मागण्यांकडे दुर्लक्ष

दरम्यान, या प्रश्नावर पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, तसेच जलजीवन मिशन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याची नाराजी आंदोलकांनी व्यक्त केली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी दूर होत नाहीत. गावाच्या मूलभूत प्रश्नांकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

केवळ पाणीपुरवठ्याचाच प्रश्न नसून चखालेवाडी गाव इतर विकासकामांपासूनही दुर्लक्षित राहिल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मेरगळ व वाघमाळी वस्त्यांमध्ये सुमारे २०० नागरिकांची वस्ती असून, त्यांच्यासाठी स्वतंत्र नवीन पाइपलाइनचे नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच श्रीराम मंदिर आणि हनुमान मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Chakhale Wadi Water Shortage
Adhala Dam Water: आढाळा धरणाचे पहिले आवर्तन सुरू; पाणी बचतीसाठी शेतकऱ्यांना आवाहन

या मागण्यांसंदर्भात ग्रामस्थांनी यापूर्वी ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे निवेदने देऊन पाठपुरावा केला. मात्र, अनेक दिवस उलटूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थांना आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या आंदोलनाचा दुसरा दिवस उलटला असून, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाणीपुरवठा योजनेची पाहणी करावी, निकृष्ट कामाची चौकशी करावी आणि नवीन पाइपलाइनसह इतर मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

वय ८५ वर्षे होत आले आहे. या वयात आम्ही पाणी कुठून आणि कसे आणायचे? गावात पाणी असूनही आम्हाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आमच्या वयाचा तरी विचार करून प्रशासनाने पाण्याचा प्रश्न सोडवावा.

ज्येष्ठ नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.