Ahilyanagar Gold Fraud Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Gold Fraud: जास्त सोन्याचे आमिष दाखवून वृद्धांची फसवणूक; ६.६० लाखांचे सोने जप्त, दोघांना अटक

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; घारगाव, मिरजगाव, नेवासा आणि चांदेकसारे येथील चार गुन्ह्यांची उकल

पुढारी वृत्तसेवा

नगर: जास्त सोन्याचे आमीष दाखवून तसेच भूरळ पाडून वृद्धांची फसवणूक करणाऱ्या अट्टल टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ६ लाख ६० हजारांची ४४ ग्रॅम सोन्याची लगड जप्त केली आहे. सचिन संजय गायकवाड (रा. औरंगपूर, ता. शिरूर, जि. बीड), संतोष मोहनराव चिंतामणी (रा. नाळवंडी नाका, ता. जि. बीड) यांना अटक केली. तर, शहादेव रामदास जाधव (रा. वडवणी, ता. जि. बीड), आबा तुपे (रा. औरंगपूर, ता. शिरूर, जि. बीड) दोघे फरार आहेत.

३० सप्टेंबर २०२६ रोजी चिखलठाण (ता. राहुरी) येथील सोपान पोपटराव डोलनर यांच्या आई साकूर बसस्थानक (ता. संगमनेर) येथे थांबलेल्या असताना, तीन अनोळखी व्यक्तीने त्यांना भूरळ पाडून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून घेतले. या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी उपनिरीक्षक कृष्णकुमार सेंदवाड यांच्या नेतृत्वात एक विशेष तपास पथक रवाना केले. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू असताना वरील गुन्हा सचिन संजय गायकवाड (रा. औरंगपूर, ता. शिरूर, जि. बीड) याने साथीदारांसह केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी खरवंडी (ता. पाथर्डी) परिसरात सापळा रचून सचिन गायकवाड याला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या सचिन गायकवाड याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी संतोष मोहनराव चिंतामणी (रा. नाळवंडी नाका, जि. बीड) यालाही ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून ६ लाख ६० हजार रुपयांची ४४ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त केली. अटक आरोपींना पुढील तपासाकामी मिरजगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, पोलिस अंमलदार निळकंठ कारखेले, राहुल द्वारके, गणेश लोंढे, विशाल तनपुरे, रोहित मिसाळ, भगवान सानप, फुरकान शेख, प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली.

चार गंभीर गुन्ह्यांची उकल

अटक आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी घारगाव (ता. संगमनेर), मिरजगाव (ता. कर्जत), नेवासा व चांदेकसारे (ता. कोपरगाव) येथे नागरिकांना जास्तीचे सोने देण्याचे आमीष दाखवून फसवणूक केल्याचे उघड झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT