

नगर: ज्या बँकेला पवारांनी नेहमीच मदत केली, त्याच बँक निवडणुकीतून मुद्दामहून राष्ट्रवादीला बाजुला ठेवले गेल्याचा मुद्दा मांडतानाच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेवरही विस्थापितांच्या शिष्टमंडळाने शरद पवारांसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान राष्ट्रवादी व शिवसेनेच्या विस्थापितांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. या भेटीत शिंदे यांनी राजकीय परिस्थितीची माहिती घेतली. मंत्री शिंदे आणि शरद पवारांकडे विस्थापितांच्या शिष्टमंडळाने गाऱ्हाणी मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.
खा. नीलेश लंके, माजी खासदार सदाशिव लोखंडे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सीताराम काकडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, ॲड. संदीप वर्पे, शिवाजीराव काकडे, अमित भांगरे, दत्ता पानसरे, ऋषिकेश ढाकणे, सुधीर म्हस्के उपस्थित होते.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शरद पवार समर्थक खा. नीलेश लंके, काँग्रेसचे प्रताप शेळके, शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांना विस्थापितांती बेदखल केले आहे. त्याच नाराजीतून विस्थापितांच्या बाजुने ११ उमेदवारी अर्ज असल्याची माहिती मुंबईतील बैठकीत मांडण्यात आली. आता पुढे काय? यावर या बैठकीत खल झाल्याचे समजते. दरम्यान मतदारांच्या गाठीभेट घेण्याचे शरद पवारांकडून सांगण्यात आल्याचे समजते.
थोरातांच्या भूमिकेवर प्रश्न
माजी मंत्री तथा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यांच्याकडे आयोजित बैठकीत खासदार लंके यांच्यासह मित्रपक्षालाही दूर ठेवले गेले. निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवताना विश्वासातही घेतले नाही असे सांगत थोरात यांच्या भूमिकेवर खा. लंके यांच्यासह शिष्टमंडळाने प्रश्न उपस्थित केले. त्यावर शरद पवार यांनी निवडणुकीतील राजकीय परिस्थितीची माहिती घेत मतदारांपर्यंत पोहचण्याच्या सूचना केल्याने सांगण्यात येते.
प्रस्थापितांवर उपमुख्यमंत्र्यांची नाराजी
विस्थापितांच्या शिष्टमंडळाने शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. महायुतीत असूनही भाजपने कशी वागणूक दिली, ही बाब माजी खासदार लोखंडे यांनी तर खासदार नीलेश लंके यांनी प्रस्थापितांचे व्देषाचे राजकारण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे समजले. बँक निवडणुकीत सेनेच्या उमेदवारी अर्जाची माहिती घेतली. आमदार विठ्ठलराव लंघे आणि आमदार अमोल खताळ यांच्या भूमिकेविषयीही बंद द्वार चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते.