

नगर: जिल्ह्यात आजमितीस फक्त ७५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, धरणांतील जिवंत पाणीसाठ्यापैकी जवळपास ४४८७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा हा अतिरिक्त बफरसाठा म्हणून राखीव ठेवला जाणार आहे. हा बफरस्टॉक अत्यावश्यक परिस्थितीत केवळ पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी वापरला जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक मुळा धरणातील २१०० दशलक्ष घनफूट पाण्याचा समावेश आहे.
जिल्ह्यात भूजलपातळी सरासरी तीन मीटरने खालावली आहे. विहिरी कोरड्याठाक झाल्या असून, धरणांतील पाणीसाठा म्हणावा असा नाही. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी शासनाने पाण्यावर निर्बंध लादले आहेत. यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन, पिण्याच्या पाण्यासाठी काही टीएमसी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश शासनाने देत १६ ऑक्टोबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत पुरवठा केला जाणार्या पाण्याला १० टक्के कात्री लावली आहे.
याशिवाय शासनाने प्रथमच धरणांतील जीवंत पाणीसाठ्यांपैकी १० टक्के पाणीसाठा हा बफर स्टॉक म्हणून राखीव ठेवण्याचे निर्देश दिलेआहेत. त्यानुसार जिल्ह्यातील आठ धरणांतील ४ हजार ४८६.५ दलघफू इतका पाणीसाठा हा बफरस्टॉक म्हणून राखीव ठेवला जाणार आहेत. मुळा धरणाचा जीवंत साठा २१ हजार ५०० दलघफू इतका आहे. दहा टक्क्यांनुसार जवळपास सव्वादोन टीएमसी पाणीसाठा हा राखीव ठेवला जाणार आहे.
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १३१ टक्के पाऊस झाला होता. त्यावेळी सर्व धरणे भरली गेली होती. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी धरणसाठा ९९.९७ टक्के इतका होता. आजमितीस जिल्ह्यात ३८ हजार ४६१.८९ दलघफू म्हणजे ७५.२५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या शिल्लक पाणीसाठ्यांतून साडेचार टीएमसी पाणीसाठा बफर स्टॉक म्हणून संकटकाळी उपयोगात आणला जाणार आहे.
पाणीसाठा (कंसात बफर स्टॉक)
भंडारदरा : ११०३९ (१०७४), निळवंडे : ६३४१ (८१०), मुळा : १८७७६ (२१५०), आढळा : १०६० (९७.५), मांडओहळ :६८.३७ (३१), सीना : ७६६ (१८५), खैरी : ७७.०२ (४८.५), विसापूर : ६४३.४० (९०.५) दलघफूमध्ये.
शेतीऐवजी औद्योगिक वापराला प्राधान्य
जनावरांसह पिण्याचे पाणी, औद्योगिक वापर आणि त्यानंतर शेती महामंडळ व इतर संस्थांच्या चारा व बी-बियाण्यांच्या कार्यक्रम ही गरज भागविल्यानंतर पाणी शिल्लक राहत असल्यास कमी पाण्यावरील रब्बी हंगामी भुसार पिके व जास्त चारा देणार्या भुसार पिकांना प्राधान्याने पाणी देण्याचे निर्देश आहेत. त्यानंतरही पाणी शिल्लक राहत असल्यास रब्बी हंगामी पिकांचा विचार होणार आहे. यानंतर पाणी शिल्लक राहिल्यास बारमाही पिकांचा विचार होणार आहे.