Sujay Vikhe Patil Pudhari
अहिल्यानगर

Sujay Vikhe Patil: जिल्हा बँकेचे नवे पदाधिकारी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार? सुजय विखे पाटलांचे संकेत

अध्यक्षपदाच्या निवडीनंतर विखेंचा माध्यमांशी संवाद; अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर थोरातांचे मौन, राम शिंदेंची मिश्किल टिप्पणी

पुढारी वृत्तसेवा

गोरक्ष शेजुळ

नगर: जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळावर कोणतीही चर्चा झालेली नाही, ती होण्याचे कारणही नाही असे सांगतानाच नवनिर्वाचित पदाधिकारी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करतील, असे संकेत बँकेचे नूतन अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व मुख्यमंत्री ठरवतील ते, असे म्हणत गुगली टाकण्यासही ते विसरले नाही. पदाधिकारी निवड धक्का बसणारी असेल, हे पूर्वीचे वक्तव्य म्हणजे टाकलेला खडा होता, असे मिश्कीलपणे सांगण्यासही ते विसरले नाही. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याबाबत माध्यमांनी विचारताच त्यांनी त्यावर भाष्य करणेही टाळले. त्यामुळेच नवनिर्वाचित पदाधिकारी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करतील, यावर जणूकाही शिक्कामोर्तब झाले.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. या संवादात डॉ. विखे यांनी पालकमंत्री विखे पाटील, माजी मंत्री थोरात, सभापती राम शिंदे यांच्यासोबतच जिल्ह्यातील आजी, माजी मंत्री, आमदार व मतदारांचे विशेष आभार मानले. सभापती राम शिंदे यांच्या सहकार्याबद्दल त्यांच्या मनाचा मोठेपणा म्हणत डॉ. विखे यांनी त्यांचे खास आभार मानले. सर्वांना विश्वासात घेऊन शेतकरी आणि कारखानदारांच्या हिताचे निर्णय बँकेतून घेतले जातील. सहकार टिकावा आणि चालावा, यासाठी प्रयत्न असतील, अशी ग्वाही डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

मिरवणुकीत दंड थोपटले

डॉ. विखे आणि देशमुख यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. विशेषतः विखे समर्थकांनी गुलाल व फुलांची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. डिजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरणाऱ्या कार्यकर्त्यांना डॉ. सुजय विखे दाद देत होते. ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर समर्थक थिरकले. याच दरम्यान स्वतः डॉ. विखे पाटील यांनी दंड थोपटून ‘हम भी कम नही’ असा संदेश दिला.

पारनेरचे राहुल शिंदेंना घेतले सोबत

पारनेरमध्ये खा. लंके यांच्याकडून पराभूत झालेले राहुल पाटील शिंदे यांना डॉ. विखे यांनी मिरवणूक रॅलीत सोबत घेतल्याचे दिसले. मिरवणूक सुरू असताना डॉ. विखे यांनी राहुल पाटलांना शेजारी उभे करून करत कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, हेच दाखवून देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली. जिल्हा बँकेपासून निघालेली मिरवणूक जिल्हा परिषद चौकात पोहचल्यानंतर तेथे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

मी फोटो पुरताच चांगला दिसतो; शिंदेंची कोपरखिळी!

जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना बिनविरोधच्या बैठकीसाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी मंत्री विखे पाटील आणि माजी मंत्री थोरात यांनी सभापतींना माध्यमांसमोर ‘सन्मान’ देताना अनेकांनी पाहिले. त्यानंतर थेट गुरूवारच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पहिला सत्कार करण्याचा ‘मान’ देखील विखे-थोरातांनी सभापती शिंदेंनाच दिला. यावेळी सभापती शिंदेंनी डॉ. सुजय विखे आणि रणजित देशमुख यांचा सत्कार करताना ‘मी फोटो पुरताच चांगला दिसतो’ अशी कोपरखिळी मारताच एकच हशा पिकला.

निवडीचा कालवधी मतदार ठरवतात, आपलं भाग्य ठरवते. त्यामुळे किती कालावधीसाठी आहे, यावर कधी ना चर्चा झाली, ना कधी चर्चा होऊ शकते. मात्र, ज्येष्ठ नेते ठरवतील तसे होईल. मुख्यमंत्री ज्या दिवशी जो आदेश देतील, त्याचे पालन केले जाईल.
डॉ. सुजय विखे पाटील, नवनिर्वाचित अध्यक्ष
दुष्काळी परिस्थती जिल्हा बँकेचा मोठा आधार आहे. राज्यातील अनेक जिल्हा बँक मोडून पडल्याने तेथील शेतकऱ्यासमोर कर्जाचा प्रश्न पडला. नगर जिल्हा बँकेचेे वैभव टिकविण्यासाठी आम्ही एकत्र आलो. दुष्काळात आम्ही राजकारण केले असते तर कोणालाही आवडले नसते.
बाळासाहेब थोरात, माजी मंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT