

राहुरी: ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे साखर कारखानदार आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी काल सोमवारी (दि. ९) आक्रमक पवित्रा घेत नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. उसाला प्रतिटन चार हजार रुपये पहिली उचल द्यावी, साखरेची आधारभूत किंमत प्रतिकिलो ५० रुपये करावी, इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये निश्चित करावा आणि कारखाने लवकर सुरू केल्याबद्दल प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे, अशा प्रमुख मागण्यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर काल सकाळी ११ वाजता आंदोलन केले. ऊसदर जाहीर केल्याशिवाय महामार्गावरून उठणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता.
शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत आंदोलनाची धुरा सांभाळली. विशेष म्हणजे, हे आंदोलन केवळ निवेदन देण्यापुरते मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांनी थेट महामार्गावरच मंडप उभारून ठिय्या दिला. टाळ-मृदंग, वीणा आणि गळ्यात उसाच्या माळा घालून शेतकऱ्यांनी सरकार व साखर कारखानदारांविरोधात संताप व्यक्त केला. आंदोलन बेमुदत असल्याचे स्पष्ट करत काही शेतकरी कपडे व आवश्यक साहित्य घेऊनच आंदोलनस्थळी दाखल झाले. दुपारच्या सुमारास महामार्गावरच जेवणाच्या पंगती बसवून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा प्रश्नच नसल्याचे ठणकावून सांगितले. त्यामुळे महामार्गावरील आंदोलनाला अधिकच धार आली. यावेळी रविंद्र मोरे यांनी साखर कारखानदारांच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला. कोल्हापूर जिल्ह्यात राजू शेट्टी यांच्या आंदोलनानंतर ऊसाला प्रतिटन चार हजार रुपये दराची मागणी मान्य झाली; मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी अद्याप कारखानदारांनी ऊसदर जाहीर केलेला नाही. साखरेचे टेंडर प्रतिकिलो ५० ते ५२ रुपयांपर्यंत जात असताना या वाढीव बाजारभावाचा फायदा मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही, ही शोकांतिका आहे, अशी टीका त्यांनी केली.
जिल्ह्यातील राजकीय नेते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी एकत्र येऊ शकतात, तर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या ऊसदराच्या प्रश्नावरही त्यांनी एकजूट दाखवावी. राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मोरे यांनी केले. तर अॅड. अजित काळे यांनी राज्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना समान दर मिळण्याची मागणी केली. केंद्र सरकारने एफआरपी प्रतिटन ३ हजार ६५० रुपये निश्चित केली असतानाही शेतकऱ्यांना त्यानुसार पैसे मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला. या आंदोलनामुळे राहुरीतील ऊसदराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शेतकरी संघटनांनी एकत्रितपणे रस्त्यावर उतरल्याने कारखानदारांवरील दबाव वाढला आहे. ऊसदराच्या मागणीवर ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांच्या भूमिकेतून स्पष्ट झाला.
यावेळी रावसाहेब चाचा तनपुरे, प्रकाश देठे, देवेंद्र लांबे, सुभाष वराळे, प्रमोद तारडे, ज्ञानेश्वर कोळसे, केदारनाथ चव्हाण, बाळासाहेब जाधव, सचिन भिंगारदे, दिलीप इंगळे, संजय पोटे, बाळासाहेब लवांडे, जालिंदर गाडी, दत्तात्रय आढाव, सुरेश ताके, अनिल औताडे, अंबादास कोरडे, संतोष शेळके, पिंटू नाना साळवे, रूपेंद्र काले, दत्तात्रय लिप्टे, हरिभाऊ तुवर, विठ्ठल शेळके, जितेंद्र भोसले, रवींद्र आवळे, शरद असणे आदींसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
प्रशासनाची मध्यस्थी
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन सहकार विभागाचे अधिकारी सुनील खर्डे, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, तहसीलदार डॉ. अमित पवार आणि पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याबाबत मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र, केवळ आश्वासनांवर आंदोलन मागे घेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. ऊसदर जाहीर करून मागण्यांबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय महामार्ग मोकळा करणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यामुळे प्रशासनाचे प्रयत्न तूर्तास निष्फळ ठरले.
महिला वाहतूक कोंडीत अडकल्या
बेमुदत रास्ता रोको आंदोलनामुळे नगर-मनमाड महामार्गावरील वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाऊबीजेसाठी माहेरी निघालेल्या महिला, लहान मुले, एसटी बसमधील प्रवासी तसेच खासगी वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. काही वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा आधार घेतला, तर अनेक प्रवासी वाहतूक कोंडीत तासन्तास अडकून पडले. एकीकडे कडक उन्हाचा तडाखा, तर दुसरीकडे महामार्गावर शेतकऱ्यांचा ठिय्या, असे चित्र पाहायला मिळाले.
पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवत वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऊसदराच्या मागणीवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार कायम आहे.
आंदोलक मागण्यांवर ठाम
रात्री उशिरापर्यंत माजी खा. डॉ. सुजय विखे यांनी आंदोलकांशी चर्चा करून आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिटन ३ हजार २०० रुपयांचा ऊसदर आंदोलकांना मान्य नसल्याने त्यांनी संतप्त भूमिका घेतली. तब्बल नऊ तास उलटूनही आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम होते. रात्रीच्या अंधारात महामार्गावरच ठिय्या मांडत आंदोलकांनी रस्त्यावरच भोजन केले. दरम्यान, आंदोलनस्थळी वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे रात्रीच्या अंधारातही आंदोलन सुरूच राहिल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.