Money Scam Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar CISPE Scam: सिस्पे घोटाळा; 10 अटक, 200 खाती गोठवून 113 कोटींहून अधिक रक्कम फ्रीज

अहिल्यानगर जिल्ह्यातील गुंतवणूक फसवणूक प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नगर: अहिल्यानगर जिल्ह्यासह परिसरात जाळे असलेल्या सिस्पे, इनफिनाईट बिकन या कंपन्यांच्या सुमारे 14 कोटी 47 लाख 98 हजारांच्या गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे, तर कंपन्यांचे संचालक, एजंट व कंपनीच्या नावे असलेली सुमारे 200 खाती गोठविली असून, त्यात सुमारे 113 कोटी 42 लाख 32 हजार 572 रुपये फ्रीज करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी शुक्रवारी दिली.

पोलिस अधीक्षक घार्गे म्हणाले, की जिल्ह्यातील वार्षिक गुन्हेगारी आणि कारवायासंदर्भात माहिती घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपस्थित होते. जिल्ह्यात जादा परताव्याचे आमिष दाखवून सिस्पे, इनफिनाईट बिकन यांसारख्या अनेक कंपन्यांमार्फत शेअर मार्केटमध्ये शेतकरी, शेतमजूर, शिक्षक, महसूल कर्मचारी, पोलिसांनी पैसे गुंतविले. सुरुवातीला काही दिवस परतावा दिला. मात्र, नंतर तो बंद झाला. या कंपन्यांविरुद्ध तोफखाना (अहिल्यानगर), सुपा (पारनेर), श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

सिस्पे घोटाळ्याबद्दल माहिती देताना अधीक्षक घार्गे म्हणाले, की शेअर मार्केटमधील सिस्पे, इनफिनाईट बिकन या कंपन्यांच्या 14 कोटी 47 लाख 98 हजार 572 रुपयांच्या घोटाळ्याचे चार गुन्हे दाखल असून, त्यात आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात सुमारे 100 आरोपी निष्पन्न झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. गुन्ह्यात सुमारे 200 गुंतवणूकदारांचे जबाब नोंदविले आहेत. कंपनी, कंपनीचे संचालक व एजंट यांची दोनशे बॅंक खाती गोठविली आहेत. त्यात सुमारे 113 कोटी 42 लाख 32 हजार 572 रुपये फ्रीज केले आहेत. गुंतवणूकदारांना पैसे मिळण्यासाठी शासनाकडे एमपीआयडीनुसार प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना पैसे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नगर अर्बन बँक संचालकाविरोधात 291 कोटी 25 लाख 61 हजारांचा अपहार व फसवणुकीच्या आरोपावरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत 13 आरोपींना अटक केली असून, एमपीआयडी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यात 3 कोटी 15 लाख 85 रुपयांची रक्कम फ्रीज करण्यात आली आहे. 72 स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. शासनाकडे एमपीआयडी कायद्यानुसार 37 कोटी 72 लाख 80 हजार 695 रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

‌‘नगर अर्बन‌’च्या गुन्ह्यात 13 जणांविरुद्ध दोषारोपपत्र

नगर अर्बन बँक संचालकाविरोधात 291 कोटी 25 लाख 61 हजारांचा अपहार व फसवणुकीच्या आरोपावरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत 13 आरोपींना अटक केली असून, एमपीआयडी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यात 3 कोटी 15 लाख 85 रुपयांची रक्कम फ्रीज करण्यात आली आहे. 72 स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. शासनाकडे एमपीआयडी कायद्यानुसार 37 कोटी 72 लाख 80 हजार 695 रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

ते भेटतात अन्‌‍ ढसढसा रडतात

‌‘सिस्पे‌’सारख्या कंपन्यामध्ये सर्वाधिक शिक्षकांनी पैसा गुंतविला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद कर्मचारी, महसूल, पोलिस कर्मचाऱ्यांनीही पैसा गुंतविला आहे. गेल्या काही दिवसांत अनेक कर्मचारी गुपचूप येऊन हकीगत सांगतात आणि ढसढसा रडतात, असेही घार्गे यांनी सांगितले.

दुबई रिटर्न, कारवाई अंतिम टप्प्यात

सिस्पे, इनफिनाईट बिकन कंपनीचे दोन संचालक दुबईला पळून गेल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना तेथून भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यांनी छोट्या राष्ट्रांमध्ये पैसे देऊन नागरिकत्व मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो हाणून पाडल्याचे घार्गे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT