

उंबरे : राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे मार्गासाठी पिंप्री, उंबरे, ब्राह्मणी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनींचे भू-संपादन करण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांना भूमिहीन करून केला जाणारा हा विकास आम्हाला मान्य नसून, उंबरे गावची एक गुंठाही जमिनी अधिग्रहीत होऊ देणार नाही. त्यासाठी प्रसंगी जेलभरो आंदोलन करू, असा इशारा तनपुरे कारखान्याचे माजी संचालक सुनील आडसुरे यांनी दिला.
आडसुरे म्हणाले, केंद्राच्या रेल्वे प्रशासनाने राहुरी-शिंगणापूर या नियोजित रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी त्यांना नोटीसा बजावल्या आहेत. मात्र, वाडवडिलांपासून जपलेली जमिनी आज रेल्वे मार्गात जाणार असल्याने अनेकांनी धसका घेतला आहे. जमिनी गेल्या तर पुढे काय.., नोकऱ्या नाहीत, मुलांचे काय होईल, या चिंतेने संबंधित शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
काहींना रुग्णालयात हलवावे लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी फुलवण्याऐवजी, त्यांनी काबाडकष्टाने पिकवलेल्या पिकांवरून आता ‘रेल्वे’ फिरवणारा हा विकास संतापजनक बनला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत रेल्वे मार्ग पुढे जाऊ देणार नाही. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनात आपण पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांच्या मागे भक्कमपणे उभे आहोत. प्रसंगी शेतकऱ्यांसमवेत रस्त्यावर उतरू, जेलभरो करू आणि वेळ पडलीच तर रक्ताचे पाट वाहू, असा इशाराही आडसुरे यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यासाठी दि. 10 डिसेंबरला शासनाची अधिसूचना जारी झाली. त्यानंतर 30 दिवस हरकती घेण्यासाठी दिल्या. मात्र, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याची माहिती समजली नाही. आताशी समजली, तर केवळ एकच दिवस बाकी आहे. त्यामुळे दि. 10 जानेवारीपर्यंतच हरकती घ्याव्या लागणार आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या हरकती नोंदवाव्यात, कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे इंजि. गोरक्षनाथ दुशिंग यांनी सांगितले.