पारनेर: अहिल्यानगर जातपडताळणी समितीकडून सध्या कुणबी-मराठा जातपडताळणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून होत आहे. (Latest Ahilyanagar News)
रक्तनात्यामधील वडील, भाऊ, बहीण यांच्या पडताळणी होऊनही सध्याच्या अर्जदारांचे प्रकरणे रिजेक्ट केली जात आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्हा जातपडताळणी कार्यालयात पडताळणी समितीने कुणबी-मराठा विद्यार्थ्यांची अनेक प्रकरणे रिजेक्ट केली आहेत. पणजोबा,खापर पणजोबा यांची मुलगी,मुलगा मयत झाले त्यांची वारस नोंद मागवून प्रकरण मागे पाठवण्यात येते.
घरातील वडील,भाऊ, बहीण, रक्तातील नातेवाईक यांची जातपडताळणी झालेली असताना जास्तीचे कागदपत्रे जोडण्याची गरज नसल्याचे शासनानेच परिपत्रक काढले आहे. मात्र, या निर्णयाला हरताळ फासून जातपडताळणी समितीने प्रकरणे थेट रिजेकट केली आहे. यामुळे मराठा -कुणबी समाजावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे.
जरांगे, विखे यांच्याकडे करणार तक्रार
अहिल्यानगर जिल्हा जातपडताळणी समितीकडून कुणबी मराठा समाजावर अन्याय केला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. याबाबत मऩोज जरांगे पाटील,मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात येणार आहे. दिवाळीनंतर मंत्रालया समोर आंदोलन करण्याचा इशारा सकल मराठा आरक्षण संघर्ष समितीचे निलेश खोडदे, ॲड गणेश कावरे, सतीश म्हस्के, अशोक कावरे, दत्तात्रय अंबुले, संभाजी औटी, बाळासाहेब मते यांनी दिला आहे.