

नगर: सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने 8 लाख 27 हजार 118 शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वी ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. (Latest Ahilyanagar News)
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांतील शेतीपिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यात सुमारे 6 लाख 2 हजार 194 हेक्टर क्षेत्रावर या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम झाला होता. या अनुषंगाने महसूल आणि कृषी विभागांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची आकडेवारी व मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता.
राज्यातील सर्व बाधित जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत 3 हजार 258 कोटी 56 लाख रुपयांच्या मदतीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार अहिल्यानगर जिल्ह्यास 846 कोटी 96 लाख 88 हजार 520 रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीचा लाभ जिल्ह्यातील 8 लाख 27 हजार 118 शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.
बागायती पिके 3.74 लाख हेक्टर
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील 6 लाख 2 हजार 194.50 हेक्टर पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. यामध्ये 3 लाख 74 हजार 542 हेक्टर बागायती, 2 लाख 15 हजार 693 हेक्टर जिरायती पिकांचा तर 11 हजार 959 हेक्टर फळबागांचा समावेश आहे. जिरायती पिकांसाठी 8 हजार 500 रुपये हेक्टर, बागायती पिकांसाठी 17 हजार रुपये तर फळबागांसाठी 22 हजार 500 रुपये हेक्टर मदत जाहीर करण्यात आलेली आहे. ही मदत फक्त 2 हेक्टर क्षेत्रापर्यंत उपलब्ध करण्यात आलेली आहे.
मदत निधी वितरित करताना शासनाच्या नियम व निकषांचे काटेकोर पालन करण्याच्या, नैसर्गिक आपत्ती संदर्भातील अटी व शर्तींची पूर्तता करण्याच्या तसेच लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
नगर : 48517 : 50 कोटी 13 लाख पारनेर : 52708 : 44 कोटी 52 लाख
पाथर्डी : 107643 : 101 कोटी 29 लाख कर्जत : 99961 : 99 कोटी 43 लाख
जामखेड : 55481 : 57 कोटी 30 लाख श्रीगोंदा : 67674 : 71 कोटी 52 लाख
श्रीरामपूर : 40741 : 39 कोटी 25 लाख राहुरी : 58940 : 64 कोटी 03 लाख
नेवासा : 98272 : 107 कोटी 44 लाख शेवगाव : 78469 : 107 कोटी 26 लाख
संगमनेर : 25971 : 22 कोटी 20 लाख अकोले : 2044 : 76 लाख 4 हजार 80
कोपरगाव : 45207 : 39 कोटी 23 लाख राहाता : 45490 : 42 कोटी 58 लाख