मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षा निकोप, गुणवत्तापूर्ण वातावरणात होण्यासाठी आता राज्यस्तरीय दक्षता समिती नियुक्त केली आहे. या परीक्षांवेळी कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्याबरोबरच तणावमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्याची जबाबदारी राज्यस्तरीय दक्षता समितीवर सोपवण्यात आली असून, परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्हीचे नियंत्रण जिल्हा प्रशासनाकडे असेल.
शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासननिर्णय प्रसिद्ध केला. दहावी, बारावीच्या परीक्षा निकोप, गुणवत्तापूर्ण वातावरणात होण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. त्यानुसार प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन केली आहे. दक्षता समितीच्या सदस्यांनी परीक्षा कालावधीत केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे.
विभागीय परीक्षा मंडळांनी उपद्रवी आणि संवेदनशील केंद्र ठरविलेल्या परीक्षा केंद्रांवर प्रभावी यंत्रणेची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. जिल्हास्तरावर दक्षता समिती कार्यरत असली, तरी राज्यस्तरावर समन्वय, नियंत्रण व प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र राज्यस्तरीय दक्षता समितीची गरज लक्षात घेऊन राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे.
शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय दक्षता समितीमध्ये राज्य मंडळाचे अध्यक्ष, सर्व परिक्षेत्रांचे विशेष पोलिस महानिरीक्षक, अतिरिक्त आयुक्त, विभागीय आयुक्त सदस्य कार्यालय, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक, शिक्षण योजना संचालक, राज्य मंडळ सचिव यांचा समावेश आहे.
परीक्षेच्या एक दिवस आधी परीक्षा केंद्रावरील भौतिक सुविधा व्यवस्थित असल्याची खात्री करणे
जिल्ह्यातील सर्व उपद्रवी, संवेदनशील केंद्राची माहिती संकलित करणे
परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षेशी संबंधित सर्व खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध असल्याची, चित्रीकरणाची साठवणूक होत असल्याबाबतची खात्री करणे
उपद्रवी आणि संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरावर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे देखरेख ठेवणे