

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ज्याला विरोध केला त्यालाच पक्षाने तिकीट दिल्याने ते पॅनलमधील अधिकृत उमेदवार झाले आहेत. त्यामुळे इच्छा नसतानाही पक्षाचा आदेश मानून संपूर्ण पॅनलचा प्रचार करण्याची वेळ त्या उमेदवारांवर आली आहे. मने जुळली नसल्याने प्रचारात ताळमेळ नसल्याचे चित्र प्रचारादरम्यान दिसत आहे. समन्वय व एकजूट नसल्याने अनेक पॅनलचे प्रचाराचे नियोजन फसले आहे.
नवी मुंबईत सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर न करता थेट उमेदवारांच्या हातात पक्षाचे एबी फॉर्म दिले आहेत. त्यामुळे पॅनलमध्ये कोण उमेदवार आहेत, हे अनेकांना शेवटच्या दिवसापर्यंत माहीत नव्हते. पक्षाशी तसेच, प्रमुख उमेदवारांशी संबंध नसलेल्या अनेक उमेदवारांना ऐनवेळी तिकीट मिळाले. विशेषत एसटी या आरक्षित जागांवरील उमेदवार बहुतांशी नवखे आहेत. माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांऐवजी त्यांच्या पत्नी, आई, मुलगी किंवा सून रिंगणात आहेत. दुसऱ्या पक्षातून आलेले उमेदवारही पक्षाने पॅनलमध्ये लादले आहेत. त्यामुळे प्रचार सुरू होऊन आठवडा उलटला तरी, अद्याप पॅनलमध्ये एकसूत्रता दिसून येत नसल्याचे चित्र आहे. चारही उमेदवार आपआपल्या पद्धतीने प्रचार करीत आहेत.
आपल्या नियोजनानुसार प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. चारही उमेदवार एकाच भागांत वारंवार प्रचार करीत असल्याचे दिसून येत आहे. तर, काही जण आपल्या भागातच प्रचार करीत आहेत. पॅनलमधील इतर उमेदवारांच्या भागात ते प्रचार करीत नसल्याचे दिसून येत आहे. माहितीपत्रकेही सर्वच उमेदवारांकडून स्वतंत्रपणे छापण्यात आली आहेत. अनेकांनी स्वत:चे छायाचित्रे असलेली माहितीपत्रक छापली आहेत. इतर तीन उमेदवारांना पत्रकात स्थान दिलेले नाही. काही ठिकाणी पॅनलमधील तीन उमेदवारांना ठेंगा दाखवत एकाच उमेदवाराने जाहिरात होर्डींग लावले आहेत. केवळ आपल्याला विजयी करण्याचे आवाहन केले जात आहे.
प्रमुख पक्षांच्या पॅनलमध्ये ही अवस्था असून, प्रादेशिक, स्थानिक व अपक्षांच्या पॅनलचे तर काही विचारण्याची सोय नाही. पॅनलमधील प्रत्येक उमेदवारांनी किती खर्च करायचा, पत्रके कोणी छापायची, रॅली, मेळावा, सभांचे नियोजन कोणी करायचे यावरून एकमत होत नसल्याचे दिसत आहे. त्याचा मतदारांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. या सर्व कारणांमुळे पक्षाचे पदाधिकारी वैतागले आहेत.
पॅनलमधील प्रचाराचा खर्च सर्व चार उमेदवारांकडून समान प्रमाणात सोसला जातो. मात्र, त्यात कोण किती खर्च करणार, यावरून पॅनलमध्ये तू तू मैं मैं होत असल्याचे दिसून येत आहे. मीच का खर्च करायचा. तो का खर्च करत नाही, असे सांगत वाद होत आहेत, पॅनलप्रमुख असलेले प्रमुख उमेदवार वाद मिटवून प्रचार सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. परिणामी, खर्चाची मदार पॅनल प्रमुखांवर येऊन पडली आहे.
प्रमुख राजकीय पक्षाचे पॅनल सर्वच प्रभागात आहेत. मात्र, एका विचाराचे उमेदवार नसल्याने एकमेकांची तोंड विरोधात आहेत. प्रचार सुरू होऊन आठवडा उलटला तरी, पॅनलमधील प्रत्येक उमेदवार स्वतंत्रपणे प्रचार करत असल्याचे चित्र आहे. तीन उमेदवारांचा परिसर सोडून उमेदवार आपल्याच भागात प्रचार करत आहेत. रिक्षा, टेम्पोवर एकाच उमेदवारांचे ठळक छायाचित्रे लावली गेली आहेत, एलईडी व्हॅनवर स्वत: केलेली कामेच दाखवली जात असून पत्रकेही तशीच छापली आहेत.