प्रातिनिधिक छायाचित्र.  Pudhari News
मुंबई

Sanjay Raut Apology : 'माफी मनापासून असावी': सरन्यायाधीशांविरुद्धच्या टिप्पणीवरून सुप्रीम कोर्टाने संजय राऊतांना फटकारले

Sanjay Raut Supreme Court Contempt Hearing : सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर सुनावणी

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Raut Supreme Court Contempt Hearing : "श्री. संजय राऊत, तुम्ही एक अनुभवी राजकारणी आहात; आम्ही वकील असल्यापासून तुमची भाषणे ऐकत आलो आहोत. तुम्ही एक अनुभवी संसद सदस्य आहात. तुम्ही स्वतः पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम केले आहे. त्यामुळे, संयम कसा पाळावा, हे तुम्हाला ठाऊक असायला हवे," असे स्पष्ट करत माफी मागताना ती मनापासून असावी, केवळ वरवरची नसावी, अशा शब्दांमध्ये आज (दि. १७) सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना फटकारले.

संजय राऊतांविरोधात अवमान याचिकेवर झाली सुनावणी

'लाईव्हलॉ'च्या वृत्तानुसार, संजय राऊत यांना सरन्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेवर केलेल्या टिप्पणीविरोधात सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाच्या आधीच्या निर्देशानुसार, संजय राऊत प्रत्यक्ष न्यायालयात हजर होते, तर वाघले आभासी (व्हर्च्युअल) माध्यमातून सुनावणीत सहभागी झाले होते.

युक्तिवादावेळी संजय राऊतांनी शेअर केलेल्या फोटोचा उल्लेख

सुनावणीदरम्यान, SCBA चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांनी खंडपीठाला सांगितले की, राऊत यांनी त्यांच्या टिप्पणीबद्दल माफी मागितली असली, तरी त्यानंतरही त्यांनी सोशल मीडियावर सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात पोस्ट केल्या आहेत. राय यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, राऊत यांनी अल्बेनियाच्या सर्वोच्च न्यायालयाला आंदोलकांकडून आग लावली जात असल्याचा एक फोटो शेअर केला होता.

आम्ही वकील असल्यापासून तुमची भाषणे ऐकत आलो आहोत : न्‍या. कुमार

यावेळी न्यायमूर्ती कुमार म्हणाले, "श्री. संजय राऊत, तुम्ही एक अनुभवी राजकारणी आहात; आम्ही वकील असल्यापासून तुमची भाषणे ऐकत आलो आहोत. तुम्ही एक अनुभवी संसद सदस्य आहात आणि स्वतः पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम केले आहे. त्यामुळे, संयम कसा पाळावा, हे तुम्हाला ठाऊक असायला हवे."

सर्वोच्च न्यायालयाने बजावली होती कारणे दाखवा नोटीस

सर्वोच्च न्यायालयाने १६ ऑक्टोबर रोजी राऊत आणि वाघले यांना सरन्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेविरुद्ध केलेल्या कथित टिप्पणीबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली होती. ही अवमान कारवाई, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाला वैयक्तिक भेटीसाठी दिलेला नकार आणि त्यातून निर्माण झालेल्या वादाशी संबंधित आहे. सरन्यायाधीशांनी त्यांना वैयक्तिक भेटीऐवजी याचिकेच्या माध्यमातून न्यायालयात येण्यास सांगितले होते.

वाघले आणि राऊत यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणीविरोधात याचिका

सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेनुसार, वाघले यांनी एका वृत्तावर प्रतिक्रिया देताना 'एक्स' (X) वर सरन्यायाधीशांविरुद्ध कथित आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, नंतर त्यांनी ही पोस्ट हटवून माफी मागितली होती. दुसरीकडे, राऊत यांनी न्यायाधीशांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी असा दावा केला होता की, काही न्यायाधीशांनी भाजपद्वारे आयोजित राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावली होती आणि मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या मेजवानीत सहभाग घेतला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT