sanjay raut press conference : "शिंदे गटाचा कोथळा अमित शहाच काढणार, हे तुम्ही लिहून घ्या. एकनाथ शिंदे यांचे ३५ आमदार फुटणार असून, यासाठी भाजपने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नेमणूक केली आहे," असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. १ डिसेंबर) केला. आजारपणामुळे काही काळ ब्रेक घेतल्यानंतर प्रथम माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, राज्यात नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत यापूर्वी कधीही पैशाचा इतका खेळ झाला नव्हता. या निवडणुकांमध्ये सरकार भाग घेत नव्हते. स्थानिक पातळीवर निवडणुका लढविल्या जात होत्या. आता या निवडणुकीत हेलिकॉप्टर, खासगी विमानांचा वापर झाला. नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी तीन पक्षांमध्येच स्पर्धा सुरू आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून कोणासाठी लढताय, असा सवाल करत आपापसातील मारामारी सोडा, असे आवाहनही त्यांनी केले.
आपल्या प्रकृतीविषयी बोलताना राऊत म्हणाले की, "मागील काही दिवस मी वैद्यकीय कैदखान्यात आहे. माझ्या तब्बेतीत सुधारणा होते आहे, अजूनही सुधारणा होईल. उद्धव ठाकरे यांचं माझ्यावर बारीक लक्ष आहे. आजारापेक्षा उपचार कठोर असतात. मला खात्री आहे डिसेंबर नंतर मी पूर्ण बरा होईल. रेडिएशनचा भाग संपलाय. रिकव्हरी सुरू आहे."
देवेंद्र फडणवीस हे आमचे मित्र होते आजारपणात त्यांनी स्वतः फोन केलेला. राजकारण वेगळं व्यक्तीगत नातं वेगळं असतं. केंद्रामधील सर्वांनी चौकशी केली. नरेंद्र मोदी यांनी देखील चौकशी केली. २ दिवसांत राज ठाकरे इकडे येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्या नगरपालिका निवडणुकीत लक्ष्मी दर्शन होणार, असे शिंदे गँगनी सांगितले आहे. याची निवडणूक आयोगाने माहिती घ्यायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले. एकनाथ शिंदेंना वाटते की दिल्लीतील दोन नेते आमच्या पाठीशी आहेत; पण ते कोणाचेच नाहीत. शिंदे यांचा पक्ष फुटलेला आहे. अमित शहाने निर्माण केलेला गट आहे, असा आरोपही त्यांनी केला.
पैशाच्या ताकदीवर निवडणुका लढणे म्हणजेच लोकशाही नाही. यशवंतराव चव्हाणांपासून या राज्याचे नेतृत्व पाहिलेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा होती. फडणवीस यांचं राजकारण शिंदे यांना कळत नसेल तर त्यांनी करू नये. फक्त पैशावर राजकारण चालत नाही. पैशावर लोक विकत घेता येतात, असेही राऊत म्हणाले.
भाजपचे खासदार नारायण राणे, निलेश राणे यांचे अभिनंदन. त्यांनी निवडणुकीत कशा प्रकारे पैशाचे वाटप होते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत. ते कुठेही निवडणुका जिंकू शकतात. ते जर्मनीमध्येही निवडणुका जिंकू शकतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
नरेंद्र मोदी, अमित शहा, गौतम अडाणी यांची इच्छा ठाकरे बंधूंनी एकत्र न येण्याची आहे; पण बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आणि मनसे या दोघात सकारात्मक चर्चा सुरू आहे. जागा वाटपावर बैठका सुरू आहेत. राज ठाकरे यांनी पीपीटी (PPT) तयार केलं होतं निवडणुका संदर्भात ते उद्धव ठाकरे यांना आवडलं, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसशी आमची चर्चा सुरू आहे. मी डिसेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात दिल्लीत जाणार आहे. चर्चा करणार. काँग्रेसने आमच्या सोबत असावं ही आमची भावना आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.