

मालवण : आमदार नीलेश राणे ही शिवसेनेची भगवी रेषा आहे. इलाखा किसिका भी हो, धमाका नीलेश राणे ही करेगा. शिवसेनेचे खणखणीत नाणे म्हणजे नीलेश राणे. नीलेश कधीही घाबरत नाही. ‘नीलेश विरोधियोंपर करोगे मात, डरनेकी नहीं बात, तुम्हारे पिछे है एकनाथ’ असे म्हणत कुणालाही घाबरण्याची गरज नाही, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवण येथील जाहीर सभेत बोलताना दिला.
नीलेश राणे यांचे प्रामाणिकपणे केलेले काम पाहून काहींना पराभव दिसायला लागला की त्यांचा दशावतार सुरू होतो, असा टोलाही त्यांनी लगावला. मालवणला विकासाच्या नव्या उंचीवर आपल्याला घेऊन जायचे आहे. त्यासाठी आपण प्रस्ताव द्या, मालवणच्या विकासासाठी भरघोस निधी दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तू कोकणचा खर्या शिवसेनेचा हिरा आहेस असेच चांगले काम करत राहा असे म्हणत निलेश राणेंना पाठिंबा दिला.
मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा मालवण टोपीवाला ग्राऊंडवर झाली. उद्योगमंत्री उदय सामंत, आ.निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, माजी जिल्हा प्रमुख संजय पडते, महिला जिल्हाध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, माजी नगराध्यक्ष महेश कांदळकर, नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर, नगराध्यक्षा उमेदवार ममता वराडकर आदींसह नगरसेवक उमेदवार उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवप्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आले.
या सभेत त्यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेची आठवण करून देत अनेक यशस्वी उदाहरणांची माहिती दिली. ते म्हणाले, या राज्याला पुढे नेण्याचे काम केले आणि कोकणावर बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम होते. या कोकणातील विकास प्रकल्प नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री काळात आले. आता आपला उद्योगमंत्री उदय सामंत उद्योग वाढवत आहेत. माझ्यासोबत निलेश राणे हे मालवणच्या विकासासाठी काम करत आहेत. त्यांना भरघोस निधी दिला जाईल, हा एकनाथ घेणारा नाही, देणारा आहे.
3 तारखेला विरोधकांचे टांगे पलटी: निलेश राणे
मागच्या काळात कोणी-कोणी लुटालूट केली हे जनतेला माहीत आहे. आमचा एकही उमेदवार भ्रष्टाचार करणार नाही, आज माझ्यावर टीका होत असेल तर होऊ द्या. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येथे आले आहेत. शिवसेनेवर कितीही टीका झाली तरी 3 तारखेला समोरच्यांचे ‘टांगे पलटी’ होणार, हे निश्चित असल्याचे आमदार निलेश राणे म्हणाले. अनेकांनी तिकीट देतो असे सांगून दिलेला शब्द पाळला नाही. मात्र शब्द पाळणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मला उमेदवारी दिली असेही राणे म्हणाले.
ओरोस येथील उबाठा मधील नागेश ओरोसकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी दत्ता सामंत संजय पडते, काका कुडाळकर, महेश कांदळकर, राजा गावकर आदींनी मनोगते व्यक्त केली.
खा. नारायण राणे आणि ना.एकनाथ शिंदे भेट
एकनाथ शिंदे मालवण येथे आले असता ते थेट नारायण राणे यांची भेट घेण्यासाठी नीलरत्न बंगल्यावर गेले. तिथे नारायण राणे यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी आमदार निलेश राणे, मंत्री उदय सामंत, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत आदी उपस्थित होते. दरम्यान मागील काही दिवसात सिंधुदुर्गात ज्या काही घडामोडी घडत आहे त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नारायण राणे यांच्याशी नीलरत्न बंगल्यावर चर्चा केल्याचे सांगण्यात येते.