

Ladki Bahin Yojana
वर्धा : मागील विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाला. मग काही लोक म्हणायला लागले की आता लाडकी बहीण योजना बंद होणार. पण जेव्हापर्यंत देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, तेव्हा पर्यंत ही योजना बंद होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हिंगणघाट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खासदार रामदास तडस व सुरेश वाघमारे , रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे, भूपेंद्र शहाणे, हिंगणघाट नगर परिषदकरिता भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. नयना तुळसकर व सिंदी (रेल्वे) नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राणी कलोडे आदींसह मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पिण्याच पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला, आणि आता वाढीव पाणीपुरवठा योजना सुद्धा आणत आहे. प्रत्येक शहरात भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. हिंगणघाटला ४०० बेड हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचे काम लवकर सुरु करणार आहे.
महात्मा फुले जनाआरोग्य योजनेत पाच लाख पर्यंत उपचार मोफत देत आहे. हिंगणघाटच्या नदी जवळील परिसरातील ब्लु लाईन मध्ये आलेल्या घरांना समिती तयार करून त्यांची तपासणी करण्यात येईल. विकासासाठी निधीची कमी होणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर , आमदार समीर कुणावार, माजी खासदार रामदास तडस, जिल्हाध्यक्ष संजय गाते आदीसह मान्यवरांची भाषणे झाली. किशोर दिघे यांनी सभेचे संचालन तर आकाश पोहाणे यांनी आभार मानले. सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.