मुंबई

धोरणे ठरवणारे प्रभावी झाले तर जिजाऊंच्या स्वप्नातील ‘स्वराज्य’ येईल : राजश्री पाटील

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राजमाता जिजाऊ, शहाजीराजे महाराज या दोघांनी मिळून 'स्वराज्या' चे स्वप्न पाहिले होते. 'स्वराज्य' प्रत्येक जनमाणसाने उपभोगले पाहिजे, या भावनेतून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येक कृती होती. त्या कृतीला जिजाऊंच्या संस्काराची जोड होती. आजही राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातले स्वराज्य, रयतेचे राज्य अमंलात आणले गेले पाहिजे. आज मंत्रालयासारख्या ठिकाणाहून राबवण्यात येणारी धोरणे राज्यातल्या तळागाळापर्यंत जाऊन पोहोचली पाहिजेत. जेव्हा शेवटच्या माणसांसाठी धोरणांची अंमलबजावणी होईल तेव्हाच जिजाऊंच्या स्वप्नातील खऱ्या स्वराज्याची निर्मिती होईल, असे मत उद्योजिका राजश्री पाटील यांनी व्‍यक्‍त केले.

जिजाऊ माँसाहेब जयंतीचे औचित्य साधून मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी जयंती उत्सव समितीच्या वतीने राजश्री पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी राजश्री पाटील बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन जाधव, तर प्रमुख उपस्थितीमध्ये सतीश इंगळे, जोंधळे पाटील, सरिता बांदेकर देशमुख, नीलेश जाधव यांची उपस्थिती होती.

यावेळी राजश्री पाटील म्‍हणाल्‍या, " छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेण्यापूर्वी राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांचा इतिहास आम्ही पाहिला पाहिजे. जिजाऊंची शिकवण, जिजाऊंचे संस्कार, जिजाऊंचा कर्तबगारपणा, जिजाऊंनी जागोजागी दाखवून दिलेला धाडसीपणा हे सगळे आपसूकपणे शिवाजी महाराजांमध्ये प्रत्येक कृतीमध्ये दिसते. त्याकाळच्या सगळ्या लढाया या सत्तेसाठी होत्या, त्यात कुठेही जातीय द्वेष नव्हता. आम्ही अलीकडच्या काळात त्या सगळ्या लढायांना जातीय रंग दिला. त्यामुळे महाराजांच्या स्वप्नातील रयतेचे राज्य तरुणाईच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार करायला खूप वेळ लागला आहे."

महाराजासारखे आम्ही का वागत नाही?, महाराजांसारखे रयतेसाठीच स्वप्न आम्ही उराशी का बाळगत नाही?. कारण आमच्यावर तसे संस्कार केले जात नाहीत?. राजमाता जिजाऊंनी ते संस्कार केले म्हणून शिवाजी महाराज घडले, त्यांनी सर्वकाही रयतेसाठी हे स्वप्न उराशी बाळगले. आजची प्रत्येक महिला 'जिजाऊ'च्या रूपाने पुढे आली पाहिजे, त्यांनी आपल्या मुलाला संस्कारित केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली. प्रत्येक महिलेने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लाठीकाठी, तलवार -भाला चालवायला शिकायच्या. आता काळ बदललाय, पण तरीही महिलेला, मुलीला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण झालेच पाहिजे, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

मंत्रालयात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ठरवले तर जिजाऊंचा विचार तळागाळातल्या  प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. आम्ही राजमाता जिजाऊ ऐकल्या, अभ्यासल्या, आम्ही 'जिजाऊं'ना कामांमधून पाहणे गरजेचे आहे, ती कृती ते काम मंत्रालयासारख्या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे अंमलात आणले जाऊ शकते, असेही त्‍यांनी सांगितले.

अंगावर काटा आला अन् संपूर्ण सभागृह एकदम शांत झाले

"खानाच्या भेटीचा दिवस उजाडला, त्या दिशेने राजे जाणार. त्याच दिवशी राजे छत्रपती शिवाजी महाराज मॉसाहेबांचे दर्शन घ्यायला जातात. जेव्हा ते मॉसाहेबांचे चरण पाहताच दोन पावले मागे येतात. त्यांच्या मनामध्ये शंका आली की, हे चरण आपल्याला उद्या स्पर्श करायला मिळणार आहेत का नाही? आपण वाचणार आहोत का नाही? आपल्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर स्वराज्याचे काय होईल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात काय चाललेय हे जिजाऊंनी हेरले आणि जिजाऊ त्यांना म्हणाल्या, "शिवबा, तुम्ही स्वराज्याची काळजी करू नका, तुमचे काही बरेवाईट झाले तर आम्ही संभाजीला घेऊन रयतेसाठीचा लढा पुढे लढत राहू". राजश्री पाटील यांनी अफजलखानाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा  प्रसंगापूर्वी जिजाऊ महाराजांचा संवाद सांगितला अन्  सभागृहाच्‍या प्रत्‍येकाच्‍या अंगावर काटा आला. सारे सभागृह एकदम शांत झाले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT