मुंबई : मेट्रो लाईन ७ वरील शंकरवाडी रेल्वे स्थानकाचे नाव बदलल्याने रहिवाशी आक्रमक | पुढारी

मुंबई : मेट्रो लाईन ७ वरील शंकरवाडी रेल्वे स्थानकाचे नाव बदलल्याने रहिवाशी आक्रमक

मुंबई; पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईच्या विकासात भर घालणारी मेट्रो लाईन ७ अद्याप पूर्णपणे सुरू झाली नसतानाही ‘एमएमआरडीए’ने घेतलेल्या एका निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. मेट्रोलाईन ७ वरील जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील शंकरवाडी रेल्वे स्थानकाचे नाव बदलुन मोगरा व्हिलेज ठेवण्यात आल्याने स्थानिक रहिवाशी आक्रमक झाले आहेत. रेल्वे स्थानकास पुन्हा शंकरवाडी रेल्वे स्थानक असे नाव देण्यात यावे, अशी मागणी आमदार रविंद्र वायकर यांनी ‘एमएमआरडी’चे आयुक्त श्रीनिवासन यांच्याकडे केली आहे.

मेट्रोलाईन ६ व ७ चे काम जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रात युद्धपातळीवर सुरू आहे. यातील मेट्रो लाईन ७ ची लांबी १६.५ कि.मी आहे. दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) असा हा मार्ग असून, यात एकुण १४ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या सर्व रेल्वे स्थानकांना राज्य शासनाने अगोदरच नावे दिली होती. मेट्रोच्या कामा दरम्यान वेळोवेळी पार पडणार्‍या राज्य शासनासमवेतच्या बैठकांमध्ये राज्य शासनाने त्यावेळी दिलेल्याच रेल्वे स्थानकांच्या नावाचा उल्लेख केला जात होता. मेट्रो लाईन ७ वरील शंकरवाडी नावाने प्रचलित असलेल्या परिसरातील रेल्वे स्थानकास शंकरवाडी रेल्वे स्थानक असे नाव दिले होते; पण या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून मोगरा व्हिलेज ठेवण्यात आले. त्यामुळे स्थानकाचे नाव कोणाच्या सांगण्यावरून बदलण्यात आले, असा सवाल स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आला आहे.

मोगरा व्हिलेज हा विस्तीर्ण परिसर आहे. ज्या ठिकाणी मेट्रो लाईन ७ चे रेल्वे स्थानक उभारण्यात येत आहे तो परिसर शंकरवाडी या नावानेच प्रसिद्ध आहे. त्यामुळे या स्थानकाचे नाव शंकरवाडीच ठेवण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. येथील रहिवाशांच्या विविध शासकीय कागदपत्रांच्या नोंदीमध्ये शंकरवाडी या नावाचाच उल्लेख आहे. त्यामुळे पत्ता सांगतानाही शंकरवाडी असाच सांगितला जातो. त्यामुळे नाव बदलून पूर्वीचेच शंकरवाडी हे नाव देण्यात यावे, असे पत्र आमदार रविंद्र वायकर यांनी ‘एमएमआरडीए’चे आयुक्तांना दिले आहे.

हेही वाचा :

Back to top button