मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याने मुळशी तालुक्यातील मौजे मुंढवा येथे आयटी पार्क व डाटा सेंटर उभारण्याच्या नावाखाली घेतलेली 40 एकर जमीन वादात सापडली आहे. 1977 मध्ये ही जमिन बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला लीजवर देण्यात आली होती. परंतु, सातबारा उताऱ्यावर या कंपनीचे नाव नोंदवले गेले नसल्याने संरक्षित कुळ म्हणून अशोक गायकवाड आणि इतरांचे नाव जोडले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बॉटनिकल कंपनीचे नाव का नोंदवले गेले नाही आणि सरकारी जमिनीवर गायकवाड यांचे नाव कसे जोडले गेले याची आता चौकशी केली जाणार आहे.
मुळात अमेडिया एंटरप्राइजेसने घेतलेली जमीन ही ब्रिटीश सरकारच्या काळात महार वतनाची जमीन म्हणून नोंदवली गेली होती. परंतु, भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सर्व वतने खालसा झाली आणि ही जमिन बॉम्बे प्रांतच्या नावाने नोंद केली गेली. त्यानंतर 1977 मध्ये ही जमीन केंद्र सरकारच्या बॉटनिकल सर्व्हे या कंपनीला 2038 पर्यत लिजवर देण्यात आली. परंतु, तत्कालीन अधिकाऱ्यांनी 7/12 उताऱ्यावर बॉटनिकल कंपनीचे नाव नोंदवले नसल्याची माहिती महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, संबंधित केंद्र सरकारच्या या कंपनीने करारानुसार भाडेपट्ट्याची रक्कम दिली नसल्याने सातबारा उताऱ्यामध्ये नोंद करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.
जमिनीचा व्यवहार झालेला नसल्याने संंरक्षित कुळ म्हणून ही जमीन गायकवाड आणि इतर 272 जणांच्या नावाने 7/12 उताऱ्यावर नोंदवली गेली आहेत. परंतु, सरकारच्या नावावर असलेल्या जमिनीवर कोणाचेही नाव नोंदवता येत नाही आणि ही जमीन कोणालाही विकताही येत नाही. त्यामुळे जुन्या 7/12 उताऱ्याच्या आधारे अमेडिया एंटरप्रायझेस कंपनीला ही जमीन विकण्याचा व्यवहार पार पडल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, जमिनीचे मालकी हक्क स्पष्ट नसताना संबंधित अधिकाऱ्यांनी हा व्यवहार नोंदवला. हा व्यवहार करण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड पाहिले असते तर या जमिनीच्या व्यवहारामध्ये अनियमितता झाली नसती. त्यामुळे याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होणार असून 7/12 उताऱ्यावर बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे नाव का नोंदवले गेले नाही आणि या उताऱ्यावर गायकवाड आणि इतर 272 जणांचे नाव कसे नोंदवले गेले याची चौकशी होणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
कोरेगाव आयटी पार्कच्या शेजारी असणाऱ्या जागेचा एमआयडीसीशी कोणताही संबंध नसून, उद्योग विभागाने मुद्रांक शुल्कासाठीही कोणतीही सूट दिलेली नसल्याचे स्पष्टीकरण राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.
रत्नागिरीमधील पाली येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमीन खरेदी-विक्री प्रकरणाशी एमआयडीसी विभागाचा काहीही संबंध नाही. ती प्रायव्हेट कंपनी आहे. आमच्या विभागाकडून कोणताही बाँड या कंपनीला दिलेला नाही आणि कोणतीही सूट दिलेली नाही. मी या विभागाचा मंत्री झाल्यापासून असे कोणतेही अनियमित काम करण्याची भूमिका उद्योग विभागाने किंवा एमआयडीसीने घेतलेली नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
प्रस्तावित घटकासाठी या कंपनीने इरादा मागणी अर्ज 24 एप्रिल 2025 रोजी कार्यालयाकडे केला होता. प्राप्त अर्ज व कागदपत्रांच्या अनुषंगाने या कार्यालयाने प्रस्तावित घटकास डेटा प्रोसेसिंग, डेटा मिनिंग, डेटा सर्च इंटिग्रेशन अँड ॲनालिसिस या प्रस्तावित सेवाभावीसाठी केवळ इरादापत्र निर्गमित केलेले आहे. या प्रकरणातील संबंधित कंपनीने माहिती-तंत्रज्ञान व माहिती-तंत्रज्ञान साहाय्यभूत सेवा धोरण 2023 च्या अंतर्गत या कार्यालयास मुद्रांक शुल्कातून सूट मिळण्याकरिता कोणतीही मागणी केली नसल्याने या धोरणांतर्गत संबंधित कंपनीला या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचे मुद्रांक शुल्क पत्र निर्गमित करण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणामध्ये मुद्रांक शुल्क सूट देण्याचा विषय हा आमच्या कार्यालयाशी संबंधित नसल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
यांची मुलंबाळं जमिनी लाटून बंगले बांधतील : उद्धव ठाकरे
तुम्ही आम्ही सतत भांडत राहायचं आणि यांचे सगळे चेले चपाटे मुलं बाळं जमिनी लाटून, स्वस्तात फुकटात जमिनी घेऊन शेतकऱ्यांच्या उरावर बंगले बांधायचे, अशा शब्दात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पार्थ प्रकरणी प्रतिक्रिया नोंदविली. सरकारमधील मंत्र्यांची दररोज नवनवी प्रकरणे समोर येत आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्लिन चिट देत सुटले आहेत. अगोदर शिंदेंची प्रकरणं समोर आली. आता अजित पवारांच्या मुलाचे प्रकरण समोर आलं आहे. पण काहीही होणार नाही. यात चौकशी करतील आणि क्लीन चिट मिळेल..ते जमिनी कमवतील. तुम्ही बसा असेच, अशी टीका ठाकरे यांनी केली.
न्यायालयीन चौकशी करा : वडेट्टीवार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पार्थ पवार यांच्या कंपनीने घेतलेल्या या जमीन व्यवहाराची न्यायिक चौकशी करण्याची मागणी केली असून, ही फाईल रॉकेटच्या वेगाने फिरली, असा आरोपही केला आहे.
खडसेंसारखी कारवाई करणार का? अंबादास दानवे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
भोसरी जमीन प्रकरणात एकनाथ खडसे यांनी बाजारभावापेक्षा कमी किमतीत जमीन घेतल्याचा आरोप झाला तेव्हा ईडीकडून मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवार प्रकरणाची चौकशी लावली आहे. मात्र दोन वाक्यात उत्तर देऊन हा विषय मुख्यमंत्री महोदयांना संपवता येणार नाही, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हकालपट्टी करा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारच्या कंपनीने पुण्यातील वतनाची 40 एकर जमीन हजारो कोटी रुपयांची जमीन केवळ 300 कोटी रुपयात म्हणजे कवडीमोल भावाने हडप केली असून स्टँप ड्युटी फक्त 500 रुपये भरली आहे. त्यामुळे भ्रष्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हकालपट्टी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
पार्थ पवारांवर माझा पूर्ण विश्वास: खा. सुप्रिया सुळे
नवी दिल्ली : पार्थ पवारांवर माझा पूर्ण विश्वास आहे, ते काहीही चुकीचे करणार नाहीत, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी पार्थ पवार यांची बाजु घेतली. त्याचवेळी संबंधित जमीन सरकारची होती तर विकली कशी, स्टँप ड्युटी भरली आहे की नाही, सरकार चालवत कोण आहे, निर्णय प्रक्रियेत कोण आहेत, मुख्यमंत्र्यांनी याची नीट उत्तरे दिली पाहिजेत, अशी प्रतिक्रिया खा. सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना दिली.