मुलुंड : कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे तसेच गंभीर स्वरूपाचे आजार होत असल्यामुळे उच्च न्यायालयाने मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले. असे असतानाही केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतांसाठी महापालिकेतर्फे ऐरोली - मुलुंड जकात नाका येथे कबुतरखान्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे.
आधी पीएपी मग धारावी आणि आता कबुतरखाना उभारून हे सरकार मुलुंडकरांना गृहीत धरत आहे, या विरोधात आवाज उठवण्यासाठी व त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे 6 नोव्हेंबर रोजी मुलुंड पूर्व स्टेशन परिसर येथे निदर्शने करण्यात आली.
यावेळी भाजप, महाराष्ट्र शासन, मंत्री मंगलप्रभात लोढा व स्थानिक आमदार मिहिर कोटेचा यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व त्यांचा धिक्कार करण्यात आला. यावेळी ॲड. सागर देवरे यांनी मुलुंडमधील प्रस्तावित कबुतरखान्याविरोधात आपल्या भाषणात आवाज उठवला व मुलुंडला कबूतरखाना बनवू नये अन्यथा जोरदार आंदोलन केले जाईल असे देवरे आणि इतर वक्त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी विधानसभा प्रमुख पुरुषोत्तम दळवी, उपविभाग प्रमुख नितीन चवरे, दिनेश जाधव, सीताराम खांडेकर, शाखाप्रमुख अमोल संसारे, महिला पदाधिकारी कविता शिर्के, संचित देठे व इतर अनेक महिला आणि पुरुष शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते.