

Vande Matram Controversy:
भारतीय जनता पक्षानं भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल एक खळबळजनक दावा केला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक ऐतिहासिक पाप केल्याची पोस्ट भाजप प्रवक्ते सीआर केशवन यांनी केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात वंदे मातरंम या गीतातील दुर्गा मातेचं कडवं वगळल्याचा दावा त्यांनी केला.
भाजपचे प्रवक्ते सीआर केशवन यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट केली. त्यात नेहरूंच्या नेतृत्वाखालील काँग्रेसनं पक्षाचं राष्ट्रगीत म्हणून वंदे मातरंमचं एक छोटं व्हर्जन घेतल्याचा दावा केला. १९३७ च्या फैझपूर अधिवेशनात काँग्रेसनं वंदे मातरंम हे पक्षाचं राष्ट्रगीत म्हणून स्विकारलं होतं.
केशवन यांनी यासाठी नेहरूंनी सुभाष चंद्र बोस यांना लिहिलेल्या पत्राचा देखील दाखला दिला. त्यात नेहरू यांनी वंदे मातरंमचा दुर्गा मातेशी कोणताही संबंध नाही असं लिहिल्याचा दावा देखील नेहरूंनी केला आहे. त्यांनी वंदे मातरंम हे राष्ट्रगीत म्हणून योग्य नाही असं देखील लिहिलं होतं.
भाजप प्रवक्ते केशवन आपल्या पोस्टमध्ये लिहितात, 'वंदे मातरंम हे आपल्या देशाच्या एकतेचा आवाज आहे. आपण आपल्या मातृभूमीचा सोहळा आणि राष्ट्रीयत्वाची भावना या गीतातून जागृत करतो. ब्रिटीशांनी हे गाणं म्हणणं हा एक फौजदारी गुन्हा केला होता. हे गीत कोणत्याही धर्म आणि भाषेशी संबंधित नाही. मात्र काँग्रेसनं याचा धार्मिकतेशी संबंध जोडून ऐतिहासिक घोडचूक केली. नेहरूंच्या नेतृत्वाखालील काँग्रेसनं धार्मिक आधारावर या गीतातून दुर्गा मातेसंबंधीचा कडवं मुद्दाम काढून टाकलं.'
भाजप नेत्यानं राहुल गांधी यांच्यावर देखील निशाना साधला. त्यांनी राहुल गांधी यांचे नुकतेच छट पुजेबाबत केलेले वक्तव्य हे नेहरूंची त्याकाळची हिंदू विरोधी मानसिकता दर्शवते असं वक्तव्य केलं.
भाजप नेते सीआर केशवन यांचे हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वंदे मातरंम गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल होत असलेल्या कार्यक्रमाआधी आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि. ७) इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये वंदे मातरंम गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका कार्यक्रम घेणार आहेत. ते या कार्यक्रमात स्टॅम्प आणि नाण्याच देखील अनावरण करणार आहेत. बंकीम चंद्र चॅटर्जी यांनी ७ नोव्हेंबर १८७५ मध्ये बंगदर्शनमध्ये पहिल्यांदा वंदे मातरंम प्रसिद्ध केलं होतं.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, बंकीम चंद्र चॅटर्जी यांनी १८८२ मध्ये त्यांची अजरामर कलाकृती आनंदमठमध्ये हे गीत समाविष्ट केलं होतं. या गीताला रविंद्रनाथ टागोर यांनी संगीत दिलं होतं. हे गीत देशाच्या संस्कृतीचं, राजकारणाचं आणि समाजाचं प्रतिक बनलं.