नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी 57.15 टक्के मतदानाची नोंद झाली. 28 प्रभागातील 111 नगरसेवकांसाठी नागरिकांनी मतदान केले. मतदानाच्या आदल्या दिवशी एक, तर मतदानाच्या दिवशी एक असे केवळ दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यात दोन उमेदवारांना अटक करण्यात आली होती. हे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.
सकाळी 7.30 वाजल्यापासून नवी मुंबईतील सर्व नोड्समधील मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली होती. मात्र सकाळच्या सत्रात मतदारांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे चित्र दिसून आले.
नवी मुंबईत एकूण मतदार संख्या 9,48,460 असून त्यामध्ये पुरुष 5,16,267 तर महिला 4,32,040 आणि इतर 153 मतदारांचा समावेश आहे. एकूण 28 प्रभागात 1 ते 27 क्रमांकाचे प्रभाग 4 सदस्यीय आणि 28 क्रमांकाचा प्रभाग 3 सदस्यीय होता.28 प्रभागांमध्ये 500 उमेदवार निवडणूकीसाठी उभे आहेत. एकूण 191 मतदान केंद्र ठिकाणे असून त्यामध्ये 1148 मतदान केंद्रे आणि तात्पुरत्या मंडपातील 180 मतदान केंद्रावर मतदारांनी मतदान केले. सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या कमी असल्याने पहिल्या सत्रातील मतदानाचा टक्का केवळ 8.18 टक्के इतका नोंदविण्यात आला. त्यानंतर सकाळी 11.30 वाजेपर्यंत मतदान 19.68 टक्क्यांपर्यंत पोहोचले. दुपारच्या सत्रात हळूहळू मतदानात वाढ होत 1.30 वाजेपर्यंत 33.26 टक्के, तर 3.30 वाजेपर्यंत 45.51 टक्के मतदान झाले. तर शेवटच्या टप्प्यात 3:30 ते 5:30 पर्यंत 57.15 एवढे टक्के मतदान झाले.
सायंकाळी कामावरून परतणाऱ्या नागरिकांमुळे मतदान केंद्रांवर गर्दी वाढली आणि मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. दुपारच्या वेळेत मतदानाचा वेग मंदावल्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना मतदारांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. बोगस मतदान होऊ नये, यासाठी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत होते. याच दरम्यान प्रभाग क्रमांक 2 मध्ये बोगस मतदानाच्या संशयावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात आमनेसामने येण्याचा प्रकार घडला.
मंत्री गणेश नाईक हे कुटुंबातील सदस्यांसह कोपरखैरणेत सेक्टर 10 मधील सेंट मेरी शाळेत मतदानासाठी पोहोचले. मात्र तेथे मतदार यादीत त्यांचे नाव नव्हते. यानंतर नाईक कुटुंबासह कोपरखैरणेतील रा.फ.नाईक केंद्रावर गेले. त्याठिकाणीही त्यांचे नाव नव्हते. त्यानंतर ते पुन्हा सेंट मेरी शाळेत आले. यावेळी मात्र यादीत त्यांचे नाव होते. त्यांनी मतदान केले. या शाळेत खोली क्रमांक 9 नसल्याचे ते म्हणाले होते. मात्र त्याच 9 नंबरच्या खोलीत नाईकांनी मतदान केले.
भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदारांना अधिकृत मतदान ओळखपत्र देण्यात आले असले तरी बहुतांश मतदार मतदान केंद्रावर ओळखपत्र न आणता आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन येत असल्याचे चित्र दिसून आले. उमेदवारांकडून दिलेल्या चिठ्ठ्या किंवा बूथवरील यादीतील क्रमांक लिहूनच अनेक मतदार मतदानासाठी येत होते. एकूण मतदान झालेल्यांपैकी केवळ 5 टक्के मतदारांनीच मतदान ओळखपत्राचा वापर केल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील चिंचपाडा परिसरात काही काळासाठी ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा प्रकार घडला. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्राबाहेर ताटकळत उभे राहावे लागले. कोपरखैरणे परिसरातही असाच प्रकार घडल्याची नोंद झाली. तांत्रिक अडचण दूर केल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली.