Nashik Kumbh Mela Pudhari
मुंबई

Nashik Kumbh Mela: नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटींच्या कामांना मान्यता

पहिल्या टप्प्यात ५१४० कोटी, दुसऱ्या टप्प्यात १७०४१ कोटींची कामे; कुंभमेळा जागतिक आकर्षण ठरेल असे नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताचे पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले. कुंभमेळाच्या कामांसाठी 22 हजार 181 कोटींच्या कामांना विधानभवनातील झालेल्या कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पहिल्या टप्प्यातील 5 हजार 140 कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील 17 हजार 41 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. बैठकीला मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन, मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले, मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज अहिरे, आमदार सर्वश्री पंकज भुजबळ, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, राहुल ढिकले, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाशिक येथील काळाराम मंदिराचे काम करताना आजूबाजूच्या वाहतुकीला अडथळा होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. राम काल पथाच्या कामाला गती देण्यात यावी. शहरातील ऑप्टिकल फायबर केबलचे काम वेगाने पूर्ण करावे.

तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पातील नादुरुस्त सीसीटीव्ही बाबत पडताळणी करून नवीन सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची मान्यता घ्यावी. अमृत स्नानांच्या दरम्यान शहरातील भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता महाविद्यालयांमधील जागा पार्किंग तसेच पोलिसांसाठी घेण्याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून निर्णय घ्यावा. निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टच्या कामांचा समावेश करून पुढील कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीत आधिकाऱ्यांचा

ऑनलाइन सहभाग...

बैठकीत नाशिक त्रंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सादरीकरण केले. बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (गृह) मनिषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त मनीषा खत्री आदी उपस्थित होत्या. तसेच नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा यांनी ऑनलाइन सहभाग घेतला.

गोदावरीचे पाणी शुद्ध राहण्यासाठी काळजी

कुंभमेळ्याच्या कामांसाठी जमिनीच्या भूसंपादनाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा, नाशिक वर्तुळ मार्गातील अडथळे दूर करीत 50 टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी, कुंभमध्ये स्वच्छता महत्वाची असून शौचालये दर्जेदार असावीत. कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक शिर्डी व शनिशिंगणापूरला निश्चितपणे जाणार आहेत. नवीन घाटांच्या जागेकरिता शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, यासाठी विशिष्ट पद्धतीचा अवलंब करावा. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त व नाशिक येथील गोदावरी नदीतील पाणी कुंभमेळा दरम्यान शुद्ध राहण्यासाठी यंत्रणांनी विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT