मुंबई : महापालिका निवडणुकीची मतमोजणी प्रत्येक प्रभागनिहाय घ्यायची किंवा सर्व प्रभागांची एकाच वेळी सुरू करायची, याचा सर्वस्वी निर्णय संबंधित महापालिका आयुक्तांवर सोपवण्यात आला आहे. संबंधित पालिका आयुक्तांनी पोलीस अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या उमेदवारांशी चर्चा करून मतमोजणीबाबत निर्णय करायचा आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी दिली.
दरम्यान, मतदानादिवशी बोगस मतदार आढळल्यास त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही वाघमारे यांनी दिला.
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. या निवडणुकीची मतमोजणी 16 जानेवारीला होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत.
निवडणुकीच्या मतदानासाठी आणि मतमोजणीसाठी निवडणूक आयोग सज्ज असून, आमची सर्व तयारी झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले. यापूर्वी निवडणूक मतमोजणी एकाच वेळी हाती घेतली जात होती. मात्र, काही महापालिका आयुक्तांनी प्रभागनिहाय मतमोजणी हाती घेतल्यास ते प्रशासकीयदृष्ट्या सुलभ होईल, अशी भूमिका घेतली आहे. त्यानुसार पालिका आयुक्तांनी संबंधित पोलीस आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून योग्य तो निर्णय घ्यायचा आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, निवडणूक कालावधीत राज्यभरातून 341 आचारसंहितेचा भंग झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापैकी 280 तक्रारी निकाली काढल्या असून, 61 तक्रारी प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे, आचारसंहितेचा भंग झाल्याच्या सर्वाधिक तक्रारी मुंबई (38), भिवंडी-निजामपूर (26), पुणे (44), पिंपरी-चिंचवड (28), सांगली-मिरज-कुपवाडा (35), चंद्रपूर (25) येथून प्राप्त झाल्या होत्या, असे वाघमारे यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीसाठी राज्यात 39 हजारहून अधिक मतदान केंद्रे आहेत. यामध्ये मुंबईत 10 हजार 231 मतदान केंद्रांचा समावेश आहे. या सर्व केंद्रांसाठी प्रत्येकी तीन याप्रमाणे जवळपास 1 लाख 48 हजार मार्कर पेनचा पुरवठा केला जाणार असल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीसाठी 23 निवडणूक अधिकारी नेमण्यात आले आहेत.
मुंबईत पहिल्या टप्प्यात तब्बल साडेअकरा लाख दुबार मतदार सापडले आहेत. त्यानंतर या मतदारांची अत्यंत काटेकोर पडताळणी केल्यानंतर सध्याच्या घडीला दीड लाख दुबार मतदार आहेत, असे वाघमारे यांनी सांगितले. या दुबार मतदारांना मतदानासाठी दोन पर्याय दिले आहेत, असे आयुक्त वाघमारे यांनी स्पष्ट केले.