Municipal Election Rebellion Pudhari
मुंबई

Municipal Election Rebellion: मुख्यमंत्र्यांचा थेट नाराजांशी संवाद; ‘ऑपरेशन मनधरणी’ निर्णायक टप्प्यावर

आज उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस; भाजपसह सर्व पक्षांपुढे बंडखोरीचे मोठे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांसाठी दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस असून, दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता घेतील. त्यानंतर, राज्यातील सर्व 29 महापालिकांतील राजकीय लढतींचे चित्र स्पष्ट होईल.

अनेक ठिकाणी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात नाराजांच्या बंडखोरीने वातावरण तापलेले असताना भाजपमधील नाराजांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. भाजपचे अन्य प्रमुख नेतेही बंडखोरांशी वाटाघाटी करत असल्याचे समजते. भाजपच्या मित्रपक्षांमधूनही झालेली बंडखोरी शमवण्यासाठी सुरू करण्यात आलेले ‌‘ऑपरेशन मनधरणी‌’ आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.

सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनाही मोठ्या प्रमाणावर नाराजीचा आणि बंडखोरीचा सामना करावा लागत असला तरी भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे नाराजांची संख्याही मोठी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्वाच्या महापालिकांतील नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील नेत्यांवर सोपविली आहे. मुंबईत भाजपसमोर तीन माजी नगरसेवकांसह जवळपास सात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बंडखोरीचे आव्हान आहे. मंत्री आशिष शेलार आणि मुंबई अध्यक्ष अमीत साटम हे प्रत्येक बंडखोराची व्यक्तिश: भेट घेत आहेत. मुंबईत आतापर्यंत एका बंडखोराने आपली तलवार म्यान केली. शुक्रवारी बहुतांश ठिकाणचा असंतोष दूर झालेला असेल, असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला.

ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकांतील नाराजांची समजूत काढण्याची जबाबदारी स्वत: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उचलली आहे. त्यांच्यासोबत संदीप लेले, संजय केळकर, निरंजन डावखरे या नेत्यांनीही बंडखोरांशी संवाद चालविला आहे. नवी मुंबईत भाजपच्या तिकिट वाटपात मंत्री गणेश नाईक यांचे वर्चस्व दिसले. आमदार मंदा म्हात्रे गटाला डावलण्यात आल्याचा आरोप करत मोठी बंडखोरी झाली आहे. इथे पक्षात वरिष्ठ पातळीवरून चर्चा सुरू असल्याचे समजते.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बंडखोरांची समजूत काढण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील सरसावले आहेत. नाशिकमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे बंडखोरांची समजून काढत आहेत. सोलापूरची जबाबदारी मंत्री जयकुमार यांच्याकडे आहे.

राज्यात सर्वाधिक पक्षांतर्गत संघर्ष भाजपने छत्रपती संभाजीनगरात पाहिला. विशेषत: महिला कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया राज्यभरात चर्चेचा विषय ठरल्या. इथे माजी खासदार भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांच्यासह स्थानिक भाजप आमदारांना बंडखोरांशी चर्चा करून त्यांच्या भावना समजून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागपूरात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तळ ठोकला आहे. शिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही तिथे मदत घेतली जात आहे. उर्वरित सर्व महापालिका क्षेत्रातील प्रमुख नेते, आमदार-खासदारांना आँपरेशन मनधरणीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना आहेत. विशेषतः पक्ष संघटनेतील आश्वासक नेत्यांना कटाक्षाने सोबत ठेवण्याच्या सूचना आहेत.

तुमचे मोल मोठे : फडणवीस

माघार घेण्याच्या मनस्थितीत नसलेल्या प्रभावशाली बंडखोरांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधत आहेत. वर्षानुवर्षे पक्षकार्याला वाहिलेल्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ते ऐकून घेत आहेत. पक्षनिष्ठा वाया जाणार नाही, अशी हमी मुख्यमंत्री देत आहेत. पक्ष भविष्यात दखल घेईल, महापालिकांत स्वीकृत सदस्य, राज्य आणि जिल्हा समित्यांत सामावून घेत समाधान करण्याचा शब्दही दिला जात आहे. फडणवीस यांनी जवळपास बारा प्रमुख पदाधिकाऱ्याशी संवाद साधत त्यांची समजूत घातल्याचे समजते.

आज चित्र स्पष्ट होणार

राज्यातील 29 महापालिकांमधील एकूण 2 हजार 869 जागांसाठी एकूण 33 हजार 606 अर्ज दाखल झाले. या अर्जांची बुधवारी छाननी झाली. यात प्रमुख पक्षाच्या काही उमेदवारांचेही अर्ज अवैध ठरले. आता शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत अर्ज माघारी घेण्याची वेळ दिली आहे. तोपर्यंत किती बंडखोर, अपक्ष उमेदवार माघार घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यानंतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीचे चित्र शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT