

Raj Thackeray Bogus Voter: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांना काही आदेश दिले आहेत. मुंबईतील मनसे उमेदवारांनी 'शिवतीर्थ' निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी उमेदवारांना केवळ मार्गदर्शनच केले नाही, तर मुंबईच्या अस्मितेसाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आक्रमकपणे मैदानात उतरण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी बोगस मतदारांविरूद्ध देखील आक्रमक पवित्रा घेण्याचा आदेश आपल्या उमेदवारांना दिला आहे.
'मुंबई वाचवण्यासाठी हीच शेवटची संधी'
राज ठाकरे यांनी उमेदवारांशी संवाद साधताना अत्यंत गंभीर आणि भावनिक आवाहन केले. "मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसाकडे ही शेवटची संधी आहे," असे सांगत त्यांनी निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचे आदेश दिले. "निवडणुकीच्या काळात तुम्हाला पैशांचे आमिष दाखवले जाईल, विविध प्रलोभने दिली जातील; पण कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका," असा स्पष्ट इशारा त्यांनी आपल्या उमेदवारांना दिला.
बोगस मतदारांविरुद्ध आक्रमक पवित्रा
राज ठाकरे यांनी सुरक्षेच्या आणि पारदर्शकतेच्या दृष्टीने उमेदवारांना एक महत्त्वाचा 'ॲक्शन प्लॅन' दिला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर (बूथवर) किमान १० खंबीर कार्यकर्ते तैनात करण्यास त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, "जर मतदान केंद्रावर कोणताही बोगस मतदार आढळला, तर त्याला तिथेच फटकवून काढा," असा आक्रमक आदेश त्यांनी दिल्याने मनसे सैनिक आता अधिकच चार्ज झाले आहेत.
'ठाकरे ब्रँड' आणि महाविकास आघाडीची वज्रमुठ
यावेळी उपस्थित उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साह व्यक्त केला. "यावेळी मुंबईत फक्त 'ठाकरे ब्रँड'च चालणार," असा विश्वास महिला उमेदवारांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, तब्बल २० वर्षांनंतर बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे चित्र दिसत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक तसेच मनसे, शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यातील समन्वयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
"मराठी भाषेचा विजय आणि मुंबईच्या रक्षणासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. यावेळी महाविकास आघाडी आणि मनसेच्या युतीचाच महापौर मुंबईच्या महापालिकेत बसेल," असा ठाम विश्वास मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.