

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ कामकाजात गंभीर स्वरूपाचे गैरवर्तणूक करणा-या व निवडणूक प्रक्रियेत बाधा पोहोचविणा-या कनिष्ठ लेखापरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत दीपक जोहरे असे निलंबित करण्यात आलेल्या कनिष्ठ लेखापरीक्षकाचे नाव आहे. ते महानगरपालिकेच्या वित्त विभागात कनिष्ठ लेखापरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात (RO) करण्यात आली होती.
निवडणूक कामकाज करताना जोहरे यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन केल्याची, निवडणूक प्रक्रियेत बाधा पोहोचविल्याची तक्रार तसेच सबळ पुरावा महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला. प्रथमदर्शनी चौकशीमध्ये आढळून आलेल्या गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तणुकीच्या अनुषंगाने जोहरे यांचे तत्काळ प्रभावाने निलंबन करण्याचे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अत्यंत निष्पक्ष, पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात सुरू आहे. या प्रक्रियेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. तथापि, कोणत्याही कर्मचाऱ्याने निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण होईल असे वर्तन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे सक्त आदेश देण्यात आले आहेत.