

चंदन शिरवळे
मुंबई : दलित, मुस्लिम आणि पुरोगामी मतांची बेगमी जुळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणुकीची सूत्रे नवाब मलिक यांच्याकडेच सोपविली आहेत. महायुती सरकारमध्ये सामील झालो तरी आमची विचारसरणी पुरोगामी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगत असतात. भाजपने ठाम विरोध केला तरी नवाब मलिक ही मते खेचू शकतात, या शक्यतेमुळेच सूत्रे त्यांच्याकडे ठेवण्यात आली आहेत. शुक्रवारी मलिक हे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात आपली पहिली पत्रकार परिषद घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
राष्ट्रवादीने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची सूत्रे मलिक यांच्याकडे देऊ नयेत, असा आग्रह भाजपाने धरला होता. परंतु, राष्ट्रवादीने आपल्या अंतर्गत निर्णयात बदल न करता मलिक यांच्यावरच विश्वास ठेवला आहे. नवाब मलिक यांच्यावर असलेल्या वादग्रस्त प्रकरणांचा दाखला देत भाजपाने त्यांना निवडणूक रणनीतीपासून दूर ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, राष्ट्रवादीने दुर्लक्ष केले. त्यामुळे भाजपाने या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोबत घेतले नाही. तर राष्ट्रवादीनेही स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा करून आपले उमेदवार घोषित केले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक ही आगामी विधानसभा निवडणुकांच्या द़ृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या क्षेत्रात सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ आहेत. या क्षेत्रातून अधिकाधिक आमदार निवडून आणणार्या पक्षाचेच यापुढे सरकार स्थापन होईल.
...तर महायुतीला फायदा होईल
मलिक यांना महानगरपालिका निवडणुकीपासून दूर ठेवल्यास त्याचे परिणाम विधानसभा निवडणूकीवेळीही होतील. भाजप तेव्हासुद्धा मलिक यांना दूर ठेवण्याची मागणी करू शकेल, या शक्यतेने राष्ट्रवादीने आताच भाजपच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. यावरून मलिक यांना जबाबदारी देणे हा राष्ट्रवादीने भाजपला दिलेला राजकीय संदेश आहे का, असे विचारले जात आहे. मात्र, दलित-मस्लिम मते शिवसेना उबाठा गटाकडे न जाता ती राष्ट्रवादीकडे गेली तर मतविभाजनाचा भाजप-शिवसेना युतीला फायदा होऊ शकेल असेही गणित मांडले जाते आहे.