Mumbai vs Karnataka Ranji Trophy Pudhari
मुंबई

Mumbai vs Karnataka Ranji Trophy: रणजी उपांत्यपूर्व लढतीसाठी मुंबई सज्ज; शार्दूल ठाकूर, यशस्वी जैस्वाल संघात परत

कर्नाटकविरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात शार्दूलकडे पुन्हा कर्णधारपद; जैस्वालचा मोसमातील पहिला रणजी सामना

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : कर्नाटकविरुद्ध 6 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी मुंबईचा संघ सज्ज झाला असून या महत्त्वाच्या सामन्यासाठी अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर आणि आक्रमक फलंदाज यशस्वी जैस्वाल यांचे संघात पुनरागमन झाले आहे. मुंबई संघाच्या नेतृत्वाची धुरा शार्दूल ठाकूर करणार आहे. मुंबईने या स्पर्धेच्या गट साखळीत ‌‘एलिट ग्रुप डी‌’ मध्ये 33 गुणांसह अव्वल स्थान पटकावत आगेकूच केली.

विजय हजारे करंडक स्पर्धेदरम्यान शार्दूलच्या पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने बीकेसी मैदानावर सराव सुरू केला आहे. त्याच्या अनुपस्थितीत सिद्धेश लाडने मुंबईचे नेतृत्व केले होते, मात्र आता ही धुरा पुन्हा शार्दूलकडे सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे, डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वाल देखील या मोसमातील आपला पहिला रणजी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2025 मध्ये राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने 67 आणि 156 धावांची खेळी केली होती.

मुंबईचा संघ : शार्दूल ठाकूर (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, मुशीर खान, अखिल हेरवाडकर, सिद्धेश लाड, सर्फराज खान, आकाश आनंद (यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), साईराज पाटील, शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, ओंकार टरमाळे, दिव्येश सक्सेना आणि सूर्यांश शेडगे.

कर्नाटक संघातही अनेक धुरंधर

42 वेळा रणजी विजेतेपद भूषवणाऱ्या मुंबईचा सामना 8 वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या कर्नाटकविरुद्ध होणार आहे. कर्नाटकच्या संघात देवदत्त पडिक्कल (कर्णधार), मयंक अग्रवाल, के. एल. राहुल, प्रसिद्ध कृष्णा यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश असल्याने ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

प्रदूषणाचे सावट आणि उपाययोजना

दिल्लीविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात जवळच्या बांधकामामुळे खेळाडूंना मास्क लावून खेळावे लागले होते. याची दखल घेत, या सामन्यादरम्यान बांधकामाच्या ठिकाणी संरक्षक पडदे वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT