

मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे कशेळी (भिवंडी) ते मुलुंड जकात नाका दरम्यान पाणी वहन करण्यासाठी जलबोगद्याचा आराखडा व बांधकामाची कामे युद्धपातळीवर सुरू असून ऑक्टोबर 2030 पर्यंत काम पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुलुंड जकात नाका प्रकल्प कार्यस्थळास भेट देऊन पाहणी केली.
भातसा या जलस्त्रोताचे पाणी हे मुंबई-2 आणि मुंबई -3 या दोन मुख्य जलवाहिन्यांद्वारे मुंबई महानगरापर्यंत आणले जाते. वाढत्या नागरिकरणामुळे ठाणे शहरामधील विविध विकास कामांना या जलवाहिन्यांचा अडथळा होत आहे. यामुळे उपरोक्त दोन जलवाहिन्यांची पातळी खाली सरकविण्याबाबत ठाणे महानगरपालिकेद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास विनंती करण्यात आली आहे. मुंबई महानगराची पिण्याच्या पाण्याची सतत वाढणारी मागणी लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने कशेळी ते मुलुंड जकात नाक्यापर्यंत जलबोगदा बांधण्याचे निश्चित केले आहे. हे काम सप्टेंबर 2024 पासून सुरुवात झाली.
यावेळी भूषण गगराणी म्हणाले की, कशेळी (भिवंडी) ते मुलुंड जकात नाका दरम्यान 7.1 किलोमीटर अंतरादरम्यान पाणी वहन करण्यासाठी जलबोगदा बांधकाम करण्यात येत आहे. प्रकल्प अंतर्गत बोगदा खनन संयंत्राच्या सहाय्याने बोगदा खोदकामास जुलै 2026 पासून सुरुवात करण्यात येणार आहे.
या अंतर्गत मुलुंड जकात नाका येथे 134 मीटर खोलीचा लॉन्चिंग शाफ्ट उभारण्यात येत आहे. उत्खनन कार्य 130 मीटर खोलीपर्यंत पूर्ण झाले आहे. तर, बोगदा खनन कार्य पूर्ण झाल्यानंतर बोगदा खनन यंत्र बाहेर काढण्यासाठी कशेळी (भिवंडी) येथे 128 मीटर खोलीचा पुनर्प्राप्ती शाफ्ट उभारण्यात येत आहे. पैकी शाफ्टचे उत्खनन कार्य 15 मीटर खोलीपर्यंत पूर्ण झाले आहे.