Mumbai University Kalina Bus Pudhari
मुंबई

Mumbai University Kalina Bus: कलिना कॅम्पसमध्ये 318 बसला मज्जाव; मुंबई विद्यापीठाच्या निर्णयाने विद्यार्थ्यांत संताप

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय; हजारो विद्यार्थ्यांची रोजची ये-जा विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांची रोजची कसरत वाढणार आहे. कलिना संकुलात जात असलेली बेस्टची 318 क्रमांकाची बस संकुलात येण्यास प्रशासनाने मज्जाव केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

एका आंदोलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे कॅम्पसमध्ये येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याची टीका होत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात विविध मागण्यांसाठी आंदोलनाला बसलेले राहुल बलखंडे उर्फ भंते भदन्त विमांसा यांचा मुद्दा पुढे करत प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. बसमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करणे शक्य नसल्याने बाहेरून येणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवता येत नाही, असा यामागील युक्तिवाद प्रशासनाकडून केला जात आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बाहेरून लोक कॅम्पसमध्ये येऊ शकतात, अशी भीती व्यक्त करत पोलिसांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे. या निर्णयामुळे कलिना संकुलातील विद्यार्थ्यांची दैनंदिन ये-जा

विस्कळीत झाली आहे. कुर्ला आणि सांताक्रुझ या दोन्ही स्थानकांवरून कॅम्पसपर्यंत पोहोचण्यासाठी 313 आणि 318 या दोन बसगाड्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी 313 क्रमांकाची बस विद्यानगरीच्या मुख्य प्रवेशद्वारावरुन पुढे जाते. तेथून पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, छत्रपती शिवाजी महाराज परीक्षा भवन किंवा इतर विभागांपर्यंत कामासाठी किंवा शिक्षणासाठी येत असलेल्या विद्यार्थ्यांना पायपीट करत पोहचावे लागते. तर 318 क्रमांकाची बस मुख्य प्रवेशद्वारातून येवून थेट संकुलातील विविध विभागांपर्यंत पोहोचत असल्याने अनेक विद्यार्थ्यांची ही बस सोयीची आहे. आता हीच बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.

कुर्ला किंवा सांताक्रुझ स्थानकांवरून कॅम्पसपर्यंत येण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना आता शेअर रिक्षाचा आधार घ्यावा लागत असून दररोज 30 ते 35 रुपये अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. सकाळी लेक्चरची घाई असताना बसची वाट पाहत उभे राहणे शक्य होत नाही. शिवाय बस बाहेर थांबली तर नॅनो सायन्ससारख्या विभागांपर्यंत चालत जाण्यासाठी किमान 15 मिनिटे लागतात, असे एका विद्यार्थ्याने सांगितले. विद्यापीठाने आंदोलनाला रोखण्यासाठी थेट विद्यार्थ्यांच्या सोयीवर गदा आणली आहे.

बेस्ट प्रशासनाकडे चौकशी केली असता, 318 क्रमांकाच्या बसचा मार्ग बदलण्याबाबत विद्यापीठाकडून कोणतेही अधिकृत लेखी पत्र मिळालेले नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे लेखी आदेश नसतानाही गेल्या महिनाभरापासून बस कॅम्पसमध्ये का येत नाही?

एका आंदोलनावर नियंत्रण ठेवण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्याचा निर्णय योग्य आहे का, असा सवाल आता विद्यार्थ्यांकडून केला जात असून विद्यापीठ प्रशासनाच्या या निर्णयावर तीव्र टीका होत आहे.

कॅम्पसमध्ये येणाऱ्या रिक्षांमधूनही बाहेरील लोक येतात. त्यांची चौकशी होत असली तरी रिक्षा एकदा आत आली की त्या व्यक्ती कुठे जात आहे याकडे कोणी लक्ष देत नाही. मग केवळ बसलाच अडथळा का? असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT