मुंबई : मुंबईतील रस्ते, पदपथावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून बसलेल्या बांग्लादेशी फेरीवाल्यांवर यापुढे कठोर कारवाई करून मुंबईकरांसाठी पदपथ मोकळे करणार असल्याची ग्वाही मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी दिली.
महापौरपदावर विराजमान झाल्यावर केलेल्या भाषणात महापौर तावडे म्हणाल्या की, बेकायदेशीर बांगलादेशींना मुंबईतून हटवणे हेच भाजप,शिवसेना आणि आरपीआयचे महत्त्वाचे उद्दिष्ट असेल. त्याकरता आम्ही डिजिटल सिस्टीम आणि एआयचा वापर करू. पदपथांवर अनधिकृतरित्या अतिक्रमण केलेल्या बांगलादेशींचे जात प्रमाणपत्र व बोगस आधार कार्ड शोधून त्यावर त्वरित कारवाई करू, अशी घोषणा महापौरांनी केली. पाणीपुरवठा, अग्निशमन दल, सार्वजनिक शौचालय, पार्किंग, पाणीपुरवठा प्रकल्प, वैद्यकीय सुविधा, मुंबईत निर्माण होणारी पूरपरिस्थिती, महापालिका शाळांचा दर्जा, गावठाणांचा विकास, पर्यावरणीय आराखडा,खड्डे अशा विविध मुद्द्यांना महापौरांनी स्पर्श केला. महापौर यांच्या भाषणातील मुद्दे :-
दरवर्षी होणाऱ्या पाणीपट्टीतील दरवाढीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे. दरवर्षी होणाऱ्या 8% पाणी दरवाढीला स्थगिती देऊन ,पाण्याचे दर स्थिर ठेवण्याकरता प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर टँकर माफीयांचे वाढलेले प्रस्थ आणि त्यांची मक्तेदारी बंद करण्याकरता टँकर माफिया फ्री मुंबई, हे धोरण राबविण्यात येईल.
सतत पडणाऱ्या खड्ड्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबईमध्ये युटिलिटी टनेल बनवण्यात येतील नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते डांबरी आणि नऊ मीटरपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते करण्यात येतील पादचारीस्नेही व टिकाऊ बनवण्यासाठी सर्व काँक्रीटमध्ये विकसित केले जातील. पार्किंगची क्षमता वाढवण्यासाठी भुयारी व जमिनीवरील पार्किंगची निर्मिती करण्यात येईल
पाणीपुरवठा प्रकल्प येत्या पाच वर्षात पूर्ण करून अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यात येईल प्रत्येक विभागात पाणी गळती शोधणारी यंत्रणा आणि कॅमेरे बसवले जातील. समान पाणी वितरणासाठी फ्लो मीटर बसवण्यात येतील. रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या नागरिकांना जलदेयके तसेच मालमत्ता करामध्ये सवलत देण्याची सूचना तावडे यांनी केली. मुंबई पूरमुक्त करण्यासाठी जपानी तंत्रज्ञान, आयआयटी आणि व्हीजेटीआय यांच्या मदतीने प्रयत्न होतील.येत्या पाच वर्षात पर्जन्य जलवाहिन्यांचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी उपाययोजना करण्याचे धोरण आहे, असेही त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी विशेष हेल्पलाइन सुरू करण्याचा मानस असून 75 वर्षे ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑन कॉल रुग्णवाहिका व रुग्णांच्या निवासस्थानी डॉक्टर तपासणी व्हावी याकरिता उपाययोजना केल्या जातील. प्रत्येक प्रशासकीय विभागात डायलिसिस सेंटर आणि केमोथेरपी सेंटर उभारण्याचा प्रयत्न असेल.ज्येष्ठ नागरिकांना पालिकेच्या रुग्णालयातून वर्षातून एकदा मोफत पूर्ण शरीर तपासणी उपलब्ध करून दिली जाईल. हृदयविकाराच्या रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये प्लास्टिक आणि बायपास सर्जरी सवलतीच्या दरात उपलब्ध होईल.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीप्रमाणे महापौर निधी पाच हजार रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंत करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. महापौर निधीमध्ये नगरसेवकांसह मुंबईतील दानशूर नागरिकांनी मदत करावी, असेही आवाहन त्यांनी केले.
उद्धवसेनेच्या काळात पालिका शाळांमध्ये सुरू करण्यात आलेल्या व्हर्च्युअल क्लासरूम योजनेचे त्यांनी कौतुक केले. या योजनेचा विस्तार करून शाळांमध्ये एआय लॅब उभारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
लाडक्या बहिणींना लघु उद्योग स्थापन करण्यासाठी पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, महिला सुरक्षेसाठी रात्रीचे गस्ती पथक,विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वॉर्डात वातानुकूलित, वाय-फाय सज्ज अभ्यासिका सुरू केल्या जातील.
आग लागल्यास पाच मिनिटात अग्निशमन दल पोहोचेल अशी स्मार्ट ट्राफिक प्रायोरिटी सिस्टीम वापरली जाणार असून उंच इमारतीतील आग विझवण्यासाठी या सिस्टमचा वापर केला जाईल. मराठी चित्रपटांकरिता मल्टिप्लेक्स निर्मिती करण्यात येईल तसेच मुंबईतील सर्व नाट्यगृहांचे नूतनीकरण रवींद्र नाट्य मंदिराच्या धर्तीवर करण्यात येईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले.