MMRDA Budget 2026 Pudhari
मुंबई

MMRDA Budget 2026: एमएमआरडीएचा 48 हजार कोटींचा विक्रमी अर्थसंकल्प; तिसऱ्या मुंबईसाठी 4500 कोटींची मोठी तरतूद

भूखंड विक्रीतून 11 हजार कोटींचे उत्पन्न; मेट्रो, रिंग रोड आणि भुयारी मार्गांना प्राधान्य

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने 2026-27 या वर्षाचा 48072.57 कोटींचा अर्थसंकल्प सोमवारी सादर केला. यात तिसऱ्या मुंबईसाठी 4500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तर भूखंडांच्या विक्रीतून एमएमआरडीएला 11 हजार कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. 2017-18 नंतर प्रथमच 17 लाख रुपयांंच्या शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात प्राधिकरणास यश आले आहे.

अर्थसंकल्पातील 87 टक्के तरतूद एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांसाठी आहे. याशिवाय विविध मेट्रो प्रकल्पांसाठी 13838.88 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन व गृहनिर्माण यांसाठी 731.33 कोटी रुपये, जलस्रोतांसाठी 980.87 कोटी आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी 250 कोटींची तरतूद आहे.

उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 160 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची बैठक झाली. या बैठकीत एमएमआरडीएचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. नऊ वर्षांनंतर पहिल्यांदाच प्राधिकरणाने 17 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला असून शिलकी अर्थसंकल्प सादर करणारी ही देशातील महत्त्वाची संस्था असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील 75 टक्के खर्च हा रस्ते, मेट्रो, उड्डाणपूल, बोगदे, बाह्यमार्ग यांसारख्या विकासकामांवर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एमएमआर क्षेत्रातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी युद्धपातळीवर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. प्रदेशातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पोशीर आणि शिलार या दोन्ही धरणांच्या कामांना तातडीने गती देण्याचे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले.

वाहतूक कोंडी फोडणार

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करण्यात आली आहे. एमएमआर क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 337 किमी मेट्रो जाळ्यासोबत पॉड टॅक्सी, बोट टॅक्सी, मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी, फ्लायओव्हर, अंडरग्राउंड रस्ते आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांचा एकत्रित आराखडा राबवण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

मेट्रो नेटवर्कसाठी 13 हजार 838 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मेट्रो मार्ग 4, 6,5,2 ब आणि मार्ग 12 या प्रकल्पांना वेग देण्याची सूचना त्यांनी केली. एमएमआर क्षेत्रातील सर्व प्रमुख मनपांचा मिळून नीती आयोगाच्या मदतीने एक बृहद आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी बीकेसीमध्ये पॉड टॅक्सी सेवा, तर ठाणे व मीरा-भाईंदर येथे बोट टॅक्सीचा प्रयोग केला जाणार आहे. मेट्रो-बस-जलवाहतूक यांची एकत्रित जोडणी करून प्रवास अधिक जलद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी डबल डेकर फ्लायओव्हर, अंडरग्राउंड टनेलिंग प्रकल्प, कोस्टल रोड आणि भिवंडी-नाशिक मार्गावर पर्यायी रस्ते उभारले जात आहेत. ट्रॅफिक ब्लॅकस्पॉट ओळखण्यासाठी स्वतंत्र अभ्यासही करण्यात येणार आहे. मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे आणि घोडबंदर रोडवरील रस्ता रुंदीकरणाचे काम महिनाभरात पूर्ण करण्यात येईल,असे शिंदे यांनी सांगितले.

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले असून एमएमआरडीएच्या माध्यमातून रमाबाई आंबेडकर नगर येथील 17 हजार घरांच्या प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी एसआरएकडून नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. मुंबईत 17 प्रकल्पांची यादी तयार असून ठाण्यात पाच इमारतींच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

रिंग रोडसाठी तरतूद

अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जोडणी 603 कोटी

आनंद नगर ते साकेत उन्नत मार्ग 880.12 कोटी

ठाणे किनारी मार्ग (बाळकुम-गायमुख)1,025.77 कोटी

फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत मार्ग 75 कोटी

कल्याण रिंग रोड 600 कोटी

वरळी-शिवडी उन्नत मार्ग 936.07 कोटी

विस्तारित मुंबई शहरी पायाभूत सुविधा प्रकल्प 2,362.20 कोटी

मुंबई-वाढवण द्रुतगती मार्ग (उत्तन विरार सागरी सेतू) 2,000 कोटी

मुंबई ते समृद्धी द्रुतगती मार्ग : साकेत ते आमणे जोडरस्ता 500 कोटी

पूर्व मुक्त मार्ग विस्तार (छेडा नगर, घाटकोपर ते ठाणे) 1,106.75 कोटी

कल्याण-मुरबाड ते बदलापूर रस्ता (वालधुनी नदीलगत उन्नत रस्ता) 200 कोटी

गायमुख ते पायगाव खाडी पूल 682.10 कोटी

कासारवडवली, ठाणे ते खारबाव खाडीपूल 840.71 कोटी

कोलशेत, ठाणे ते काल्हेर, भिवंडी खाडीपूल 105.51 कोटी

राष्ट्रीय महामार्ग 4 ते काटई नाका उन्नत रस्ता 900 कोटी

48,072.57 कोटींच्या अपेक्षित आर्थिक उत्पन्नात पुढील घटकांचा समावेश आहे :

जमीन विक्री 11,177.95 कोटी

अर्बन ट्रान्सपोर्ट फंड 6,368.42 कोटी

कर्जउभारणी 23,711.16 कोटी

राज्य अधीनस्थ कर्जे 3,520.00 कोटी

प्रकल्प संचालनातून मिळणारा महसूल 441.71 कोटी

शासकीय अनुदाने आणि टीडीआर 1,189.14 कोटी

भूभाडे आणि व्याज उत्पन्न 1,664.19 कोटी

भुयारी दळणवळणासाठी जोडणी

ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह कोस्टल रोड भुयारी मार्ग 1,250.00 कोटी

गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग 75 कोटी

ठाणे ते बोरिवली चारपदरी भुयारी मार्ग 3,029.51 कोटी

मुंबई इंटिग्रेटेड टनेल (बीडब्ल्यूएसएल-बीकेसी-एचएसआरटी जोडणी) 1,189 कोटी

वित्तीय शिस्त आणल्यामुळे या वेळेस शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात एमएमआरडीएला यश आले. त्याचबरोबर शाश्वत पायाभूत सुविधा उभारण्याचा अपेक्षित वेग गाठला गेला. तसेच रस्त्यांचे जाळे विस्तारून दळणवळणाच्या सुविधा वाढवणे, मुंबईवरील भार कमी करण्यासाठी तिसऱ्या मुंबईच्या उभारणीवर भर देणे आदी बाबी अर्थसंकल्पात समाविष्ट आहेत. या अर्थसंकल्पातून आर्थिक ताणापासून ते आर्थिक स्थैर्यापर्यंतची वाटचाल दिसते.
संजय मुखर्जी, आयुक्त एमएमआरडीए

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT