

मुंबई : भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक आणि शिवेसनेचे प्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्षाला धार चढली असताना या वादात आता शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी उडी घेत वनमंत्र्यांना डिवचले आहे. नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे आता जंगल पोखरले जात आहे, असा आरोप करत वनेच राहिली नाहीत तर वनमंत्री काय कामाचे, असा सवाल करत सध्या वनमंत्री स्वतःला टीआरपी मिळवण्यासाठी व्यस्त दिसत आहेत, अशी टीका राणे यांनी केली आहे.
गणेश नाईक यांनी गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी जे भूखंड मागितले होते ते बिल्डरांच्या घशात घातले जात आहेत. नगरविकास खात्यातील लोकांनी हे कर्मदरिद्री काम केले. रुग्णालय, बाग, शाळेसाठी जे भूखंड मागितले ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले. मला या गोष्टीची लाज वाटते की, ज्या मंत्रिमंडळात मी आहे त्या मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला, असा आरोप नाईक यांनी शिंदे यांच्यावर केला आहे. नाईक यांच्या या आरोपांना उत्तर देताना डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आमच्या नादाला लागू नका, असा इशारा दिला होता. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी सोमवारी नाईक यांच्यावर ‘एक्स’ या समाज माध्यमातून शरसंधान सोडले आहे. दरम्यान, नंदनवन या सरकारी निवासस्थानी पत्रकारांनी वनमंत्री नाईक यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारले असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच प्रतिक्रिया दिली. नाईक यांच्या आरोपाला डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काल उत्तर दिले आहे, अशा एका वाक्यात शिंदे यांनी सांगितले.