भाईंदर : राजू काळे
मिरा-भाईंदर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप, शिंदे शिवसेनेची युती फिस्कटल्यानंतर आघाडीतही बिघाडी झाल्याचे पहायला मिळाले. भाजपने सुरुवातीपासूनच स्वबळाचा नारा देत शेवटच्या क्षणापर्यंत सेनेच्या युती करण्याच्या प्रस्तावाला रोखून धरले होते. अनेकदा विनवण्या करूनही भाजपने युतीसाठी प्रतिसाद न दिल्याने दोन्ही पक्षांनी एकला चलोचा निर्णय घेतला आहे.
भाजपने एकूण 95 पैकी 86 जागांवर उमेदवार उभे केले असून 1 जागा रिपाइं (आ) ला दिली आहे. मात्र या जागेवरून रिपाइं स्वतःचे चिन्ह न वापरता भाजपच्याच कमळ या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे सांगण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर शिंदे शिवसेनेने 81 जागांवर आपले उमेदवार उभे केले असून त्यात भाजपने तिकीट कापलेल्या माजी नगरसेवकांचा समावेश आहे. सेनेने सुद्धा 3 जागा रिपाइं (आनंदराज आंबेडकर) ला दिल्या आहेत.
यावरून भाजप, शिवसेनेची युती फिस्कटल्याचे स्पष्ट झाले असतानाच महाविकास आघाडीची सुद्धा घडी नीट बसू शकली नसल्याचे पहायला मिळत आहे. आघाडीतील मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने बहुजन विकास आघाडीला एक जागा सोडून सुमारे 50 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर उबाठा शिवसेनेची मशाल मनसेने हाताशी धरून आघाडीतील या दोन्ही पक्षांनी निवडणुकीचे इंजिनात बसून संभाव्य विजयाची सफर सुरु केल्याचे दिसून आले आहे.
उबाठाने 76 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर मनसेने 12 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तत्पूर्वी मनसेच्या दोन गटांपैकी एका गटाने काँग्रेसचा हात धरला होता तर दुसऱ्या गटाने उबाठाची मशाल हाताशी धरली होती. मात्र या दोन्ही गटांनी एकत्र येत उबाठासोबतच जाणे पसंत केल्याने काँग्रेसने एकला चलोची भूमिका घेतली आहे.
भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा देऊ केल्या असल्या तरी या पक्षाकडून एकूण 34 जागा लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एका उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर निधन झाल्याने राष्ट्रवादीने तूर्तास 33 जागांवरच उमेदवार उभे केल्याचे स्पष्ट केले आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाने प्रतिसाद न दिल्याने या पक्षाने एकूण 15 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. याचप्रमाणे वंचित आघाडीने देखील स्वबळावर 15 उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याने यंदाच्या निवडणुकीत भाजप, सेनेची युती फिस्कटल्यानंतर महाविकास आघाडीतही बिघाडी झाल्याचे पहायला मिळाले आहे.