Mumbai Municipal Election Pudhari
मुंबई

Mumbai Municipal Election: मुंबईत मराठी माणसांचा ‘मराठीनामा’; महापालिका निवडणुकीत मराठी संघटना आक्रमक

उत्तर भारतीयांसाठी जाहीरनामा काढल्यानंतर काँग्रेसविरोधात संयुक्त महाराष्ट्र आघाडीची ठोस भूमिका; “पक्ष कोणताही असो, उमेदवार मराठीच हवा” असा स्पष्ट निर्धार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पवन होन्याळकर

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने उत्तर भारतीयांसाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर मराठी अभ्यास केंद्रासह 24 मराठी संघटनांच्या संयुक्त महाराष्ट्र आघाडीने आक्रमक भूमिका घेत बुधवारी मराठी माणसांचा ‌‘महानगरपालिकेसाठी मराठीनामा‌’ जाहीर केला. पक्ष कोणताही असो, उमेदवार मराठीच हवा, अशी ठोस भूमिका या आघाडीने जाहीर केली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारात मराठीनामा राबवण्यासाठी सरसावलेल्या संयुक्त महाराष्ट्र आघाडीतील सहभागी संघटनेत संभाजी ब्रिगेड पार्टी, बहुजन जनता पक्ष, लोक संघर्ष पक्ष, शिवराज्य ब्रिगेड, छावा ब्रिगेड, संयुक्त मराठी मुंबई चळवळ, स्वायत्त महाराष्ट्र अभियान, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठी एकीकरण समिती, जय भीम आर्मी, बहुजन रक्षक सामाजिक संघटना, जनसेना, हिंद श्रमिक क्रांती सेना, इंद्रधनु हिंद संघ, क्षत्रिय मराठा समाज सेवा संस्था, सेवार्पण प्रतिष्ठान, स्थानिक मच्छीमार नि:स्वार्थ सेवा फाउंडेशन, बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटना, राष्ट्रमाता जिजाऊ युवा मंच, शंभुराजे फाउंडेशन, शिवराज्य कामगार संघटना, संभाजी ब्रिगेड कामगार संघटना, पश्चिम महाराष्ट्र युवा संघ यांचा समावेश आहे.

काँग्रसने मोठी राजकीय चूक केली असून, ही चूक महाराष्ट्राच्या हिताला मारक ठरेल. मराठीच्या मुद्द्यावर फक्त भाषणबाजी न करता प्रत्यक्ष कृती होते का, याचा हिशेब जनतेने निवडणुकीत मागावा, असे आवाहन मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी यावेळी केले.

दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात बुधवारी मराठी भाषा अभ्यास केंद्राने तातडीची जाहीर बैठक घेतली. यावेळी पवार यांच्यासह शिवराज्य ब्रिगेडचे अमोल जाधवराव, संभाजी ब्रिगेड पक्षाचे अध्यक्ष व संयुक्त महाराष्ट्र समितीचे संयोजक सुहास राणे यांच्यासह मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीसाठी काम करणाऱ्या विविध संस्था, संघटना व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हा मराठीनामा मांडला. मराठी माणसाला केंद्रस्थानी ठेवून, परप्रांतीय राजकारणाविरोधात थेट आव्हान देणारा हा मराठीनामा आगामी महानगरपालिका निवडणुकीत राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.

त्यांनी जाहीर केलेल्या मराठीनामामध्ये मतदरांसह महापालिका प्रशासनासाठीही आवाहन करण्यात आले आहे. यात महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवा, पालिकेचे संकेतस्थळ मराठी भाषेतच हवे, पाट्या मराठीत नसणाऱ्या दुकानदारांवर कठोर आणि तातडीने दंड वसूल करावा, मांसाहारावरून घर नाकारणाऱ्या गृहसंकुलांना तत्काळ अनधिकृत ठरवून त्यांचे पाणी, वीज तत्काळ कापून टाकावे व ओसी आणि अग्निरोध प्रतिबंधक प्रमाणपत्र रद्द करावे. महानगरपालिका हद्दीतील रस्ते, चौक, बागा, क्रीडांगणे, मैदाने यांना मराठी व्यक्ती, मराठी संस्कृती यांच्या प्रतीकांची नावे द्यावीतण तक्रार नोंदविण्यासाठी प्रभागनिहाय एक खिडकी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे.

काँग्रेसने उत्तर भारतीयांसाठी स्वतंत्र जाहीरनामा काढणे महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्यासाठीही घातक आहे. मराठी माणसाच्या हक्कांचा, भाषेचा आणि सांस्कृतिक अस्तित्वाचा भाग म्हणून मराठी अभ्यास केंद्राने हा मराठीनामा जाहीर केला आहे.
डॉ. दीपक पवार, अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र
मराठीच्या प्रश्नावर स्वतंत्रपणे काम करणाऱ्या संघटनांनी आता एकत्र येण्याची वेळ आली असून त्यातूनच संयुक्त महाराष्ट्र आघाडी उभी राहिली आहे. मुंबई महानगरपालिकेत आघाडीने आठ उमेदवार दिले असून, हे उमेदवार मराठी जनतेचा जाहीरनामा घेऊन थेट जनतेत जाणार आहेत.
अमोल जाधवराव , शिवराज्य ब्रिगेड
‌‘महानगरपालिकेसाठी मराठीनामा‌’ हे नावच मराठी अस्मितेचे प्रतीक आहे. मुंबईतील मराठी लोकसंख्येचा टक्का झपाट्याने घटत असून, मराठी माणसाला नोकरी, व्यवसाय आणि संधी मिळवून देणे हेच या मराठीनाम्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
सुहास राणे, अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

मतदारांना आवाहन राजकीय पक्ष आणि धर्म कोणताही असो, मराठी उमेदवारालाच प्राधान्य द्या. मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राची संस्कृती याला महत्त्व देणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य द्या. सार्वजनिक ठिकाणी मराठी नीट बोलणाऱ्या उमेदवारालाच पसंती द्या. निवडणुकीचा प्रचार, प्रसार मराठीतून करणाऱ्या उमेदवारालाच प्राधान्य द्या. स्थलांतरितांसाठी महाराष्ट्राची भाषिक, सांस्कृतिक ओळख पुसून टाकणाऱ्या मराठी/ अमराठी उमेदवाराला नाकारा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT