मुंबई : ग्रंथप्रदर्शन, अभिवाचन अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल, मोबाइल स्टेटसवर उमटलेली गर्व आहे मराठीची हाक, कविता-अभंगांचा वर्षाव आणि पुस्तक प्रदर्शनातून व्यक्त झालेला भाषिक स्वाभिमान...अशा बहुआयामी रूपात मराठी भाषा दिन मुंबईत साजरा झाला. ‘मराठीचा अभिमान बाळगा, मराठीचा वापर वाढवा,’ हा निर्धार व्यक्त करत माय मराठी मातृभाषेला मुंबईकरांनी सलाम केला.
राज्य शासनाच्या वतीने मुंबईतील विधान भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच विधान परिषद सभापती राम शिंदे उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठी ही राज्याच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा पाया असल्याचे ठामपणे सांगत प्रशासन, शिक्षण, न्यायव्यवस्था आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मराठीचा वापर वाढवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. शासकीय कामकाज अधिकाधिक मराठीत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जागतिकीकरणाच्या युगात नव्या पिढीला मराठीशी जोडणे अत्यावश्यक असल्याचे सांगत डिजिटल माध्यमांत मराठीच्या प्रसारासाठी विशेष उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती दिली.
दादर येथील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या पुढाकारातून ‘अभिजात पुस्तक प्रदर्शन’ आणि ‘अभंग रिपोस्ट’ या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अभिजात पुस्तक प्रदर्शनात 92 प्रकाशक सहभागी झाले असून कादंबऱ्या, वैचारिक साहित्य, पौराणिक कथा, ऐतिहासिक ग्रंथ अशा विविध साहित्यप्रकारांची हजारो पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. 27 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान दुपारी 1 ते रात्री 9 या वेळेत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
दहिसरमधील विद्या प्रसारक मंडळाच्या ‘विद्या मंदिर’ शाळेत मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अभिनेत्री ऋतुजा बागवे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते ‘शब्दशिल्प’ (खंड तीन) या हस्तलिखिताचे अनावरण करण्यात आले.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित कवितोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कविवर्य अशोक नायगावकर यांनी मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे; दैनंदिन व्यवहारात मराठीतच बोलले पाहिजे, असे कळकळीचे आवाहन करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. अरुण म्हात्रे, महेश केळुसकर, प्रथमेश पाठक, संदीप राऊत, संकेत म्हात्रे आदी कवींनी मराठीची परंपरा, वर्तमान आणि भाषिक स्वाभिमान यांचे प्रभावी चित्रण केले.
बोरीवली पूर्व येथील सुविद्या शिक्षण प्रसारक संघाच्या मंगुभाई दत्ताणी विद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ज्ञ उल्हास वडोदकर होते. ज्ञानेश्वरा बरोबरच विज्ञानेश्वरही व्हा, असे आवाहन करत त्यांनी विज्ञाननिष्ठ विचारांची जोड मराठी अभिमानाला
देण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुख्यालयातही मराठी भाषा गौरव
दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर यांनी प्रशासकीय कामकाजात मराठीचा अधिक वापर करण्याचे आवाहन केले, तर सहमुख्य अधिकारी उमेश वाघ यांनी अभिजात दर्जा ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले.
मराठी भाषा दिनानिमित्त सोशल मीडियावर भावनांचा अक्षरशः महापूर उसळला. व्हॉटसॲप प्रोफाईल फोटोवर गर्व आहे मराठीचा ची चौकट, स्टेटसला कुसुमाग्रजांच्या ओळी, तर टाइमलाईनवर अभंग, कविता आणि मायबोलीच्या आठवणींनी भरलेले पोस्ट्स झळकत होते. माझी भाषा, माझी ओळख असे म्हणत मराठीशी नाते जपल्याचे दाखवून दिले. मराठी कविता, मराठी जुन्या गीतापासून ते शाळेच्या पहिल्या पाठ्यपुस्तकापर्यंतच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या शब्दांना भावनिक स्पर्श लाभला. डिजिटल जगातही मराठी तितक्याच आत्मीयतेने नांदते, याचा प्रत्यय या दिवशी ठळकपणे आला.