Maharashtra Gulf Airlift Pudhari
मुंबई

Maharashtra Gulf Airlift: आखातातील युद्धात अडकलेल्या १,४२६ मराठीजनांना दिलासा; ‘महा एअरलिफ्ट’मधून ५८ विमानांची उड्डाणे

कतार, यूएई, सौदीसह अनेक देशांत अडकलेले पर्यटक-प्रवासी; राज्य आपत्कालीन संचालन केंद्राशी संपर्क, टप्प्याटप्प्याने मायदेशी परतण्याची तयारी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : चंदन शिरवाळे

युद्धाचा भडका उडालेल्या आखाती देशांमध्ये अडकून पडलेल्या महाराष्ट्राच्या 1 हजार 426 पर्यटक-प्रवाशांशी राज्य आपत्कालीन संचालन केंद्राचा संपर्क झाला आहे. या मराठीजनांना राज्यात परतण्यासाठी 58 विमाने उड्डाणं करणार असून, हे आपत्कालीन परिस्थितीत केले जाणारे ‌‘महा एअरलिफ्ट‌’ ठरणार आहे.

आखाती युद्धाचा भडका उडताच युद्धग्रस्त कतार, यूएई, सौदी अरेबिया, बहरीन, कुवैत, ओमान, इराण, इस्राएल, जॉर्डन आदी व अन्य देशांमधून मराठीजनांच्या मदतीच्या हाका सरकारपर्यंत पोहोचल्या. मात्र, या पर्यटक प्रवाशांची संख्या आणि ठावठिकाणा याचा अंदाज लागत नव्हता. त्यासाठी राज्य सरकारच्या आपत्कालीन संचालन केंद्राने

एक लिंक तयार केली. सामाजिक माध्यमांसह देशोदेशी असलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या माध्यमातूनही ही लिंक सर्वत्र पोहोचली आणि बुधवार, संध्याकाळपर्यंत 1 हजार 426 जणांनी विविध आखाती देशातील आपला ठावठिकाणा मंत्रालयातील संचालन केंद्राला कळविला, असे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी पुढारीला सांगितले.

मंगळवारी 405 प्रवासी पर्यटक मुंबईत उतरले. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या दोन विमानांची मोठी मदत झाली. मात्र, विमानांअभावी अनेक प्रवासी अजूनही आखाती देशांमध्ये अडकलेले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी आता 4 मार्च रोजी भारतीय विमान कंपन्या 58 उड्डाणांची योजना आखत आहेत. त्यामध्ये 30 इंडिगो, 23 एअर इंडिया/एअर इंडिया एक्सप्रेस आणि इतर कंपन्याच्या विमानांचा समावेश आहे.

आतापर्यंत 1 हजार 221 भारतीय विमान कंपन्यांची आणि 388 परदेशी विमान कंपन्यांची उड्डाणे रद्द झाली आहेत. 3 मार्च रोजी भारतीय विमान कंपन्यांनी 24 तर आखातात अडकलेले महाराष्ट्राचे दीड हजार पर्यटक सरकारच्या संपर्कात

एमिरेट्स आणि एतिहाद यांनी मिळून 9 उड्डाणे केली. परदेशी विमान कंपन्या मर्यादित प्रमाणात उड्डाणे करत असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यामुळे एकाच वेळी 58 विमाने उडतील आणि मराठी जनांना घेऊन येतील, असे महा-एअरलिफ्ट आखले जात आहे.

आखाती देशांत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य आपत्कालीन संचालन केंद्रातील कर्मचारी आणि अधिकारी दिवसरात्र एक करत आहेत. सर्व जिल्ह्यांना परदेशी अडकलेल्या नागरिकांची संपूर्ण माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही सर्व माहिती एकत्र करून ती दिल्लीतील महाराष्ट्र भवन आणि संबंधित भारतीय दूतावासांना पाठविण्यात येत आहे. या सर्व कामांवर कक्ष अधिकारी योगिता गावठे आणि त्यांचे सहकारी लक्ष ठेवून आहेत.

दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या मदतीने+971503654357 हा व्हॉट्सॲप क्रमांक भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

बहरीन, कतार, ओमान, इस्राएल, कुवैत, सौदी, इजिप्त, बेल्जियम येथील भारतीय दूतावासांना नागरिकांची यादी पाठविण्यात आली.

सर्वांना निवास व भोजन व्यवस्थेसाठी सहकार्य करण्याची विनंती भारतीय दूतावासांना करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन केंद्राचे व्यवस्थापक विशेषकार सूर्यवंशी यांनी दिली.

अबू धाबी - भारत मार्गावरील इतिहाद फ्लाइट्स (दिल्ली, मुंबई, कोची, बेंगळुरू) 200 नागरिक मुंबई मुंबईत पोहोचले.

एअर इंडिया (916): दुबईत अडकलेल्या 149 प्रवाशांना घेऊन हे विमान बुधवारी सकाळी 10:58 वाजता दिल्ली विमानतळावर उतरले.

एमिरेट्स (8500): एमिरेट्सचे हे विमान 500 नागरिकांना घेऊन बुधवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.

स्टार एअरची दोन विमाने येथे 3 मार्च रोजी मंगळवारी रात्री उशिरा 167 प्रवाशांना घेऊन मुंबईत उतरली.

जिल्हानिहाय संख्या

नाशिक 245, कोल्हापूर 233, पुणे 181, सोलापूर 95, मुंबई शहर 88, मुंबई उपनगर 11, ठाणे 59, रायगड 3, रत्नागिरी 13, सिंधुदुर्ग 11, पालघर 2, सातारा 24, सांगली 45, अहिल्यानगर 38, धुळे 23, जळगाव 26, छत्रपती संभाजीनगर 8, जालना 8, बीड 21, लातूर 21, धाराशिव 27, नांदेड 52, परभणी 17, हिंगोली 1, बुलढाणा 6, अकोला 1, वाशिम 6, अमरावती 15, नागपूर 17, चंद्रपूर 3 आणि गडचिरोली 4. एकूण - 1304

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT