आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपामध्ये प्रत्येक घटकपक्षाचा सन्मान राखला जाईल : गृहमंत्री अमित शहा  File Photo
मुंबई

Maharashtra Politics | जागावाटपात सन्मान राखणार : अमित शहा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई | Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपामध्ये प्रत्येक घटकपक्षाचा सन्मान राखला जाईल, असा शब्द भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.

भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिवसेना (शिंदे) गटांना प्रत्येकी 64 जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अमान्य असल्याचे त्यांनी भाजपला कळविल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

भाजपने सुचविलेले जागावाटपाचे सूत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अमान्य आहे. अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी अजित पवार गटापेक्षा अधिक जागा मिळाव्यात, यासाठी ते आग्रही आहेत. जागावाटपात सन्मानजनक जागा मिळाव्यात, यासाठी अजित पवारही आग्रही आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांचा केवळ एकच खासदार निवडून आल्याने विधानसभेत आपल्याला अतिशय कमी जागा मिळतील, अशी भीती त्यांना वाटत आहे.

मध्यंतरी त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 60 जागांच्या पुढेच जागावाटपावर चर्चा करावी, असे वक्तव्य करून किमान 60 जागा तरी पक्षाला हव्या असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे शहा यांनी मुंबई भेटीत शिंदे आणि पवार यांची भेट घेत त्यांना सन्मानजनक जागा मिळतील, असा शब्द देत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

अमित शहा रविवार आणि सोमवार असे दोन दिवस मुंबई दौर्‍यावर होते. मुंबई दौर्‍याचा समारोप करून दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शहा यांनी मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची एक बैठक घेतली. या बैठकीला आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, तर भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महायुतीमधील मित्रपक्षांच्या नेत्यांना जागावाटपात सन्मानजनक जागा देण्याचे आश्वासन शहा यांनी दिल्याचे समजते. याशिवाय महायुतीतील इतर घटकपक्षांनादेखील विधानसभेच्या जागावाटपात योग्य जागा देण्याचा शब्द त्यांनी दिल्याचे कळते. याशिवाय ज्या जागा हमखास निवडून येतील त्यांचा लवकरात लवकर आढावा घेऊन एकत्रित बैठक करण्याच्या तसेच जागावाटप व्यवहार्य असेल याची काळजी घेण्याची, लोकसभेचा विसंवाद विधानसभेत टाळण्याच्या सूचना शहा यांनी महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत दिल्या.

अंतर्गत सर्वेक्षणावर चर्चा

दरम्यान, भाजप नेत्यांसोबत सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाकडे अमित शहा यांनी लक्ष वेधल्याचे समजते. यावेळी त्यांनी राज्य सरकारने घेतलेले निर्णय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश भाजप नेत्यांना दिले आहेत. त्यातही त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रामुख्याने उल्लेख केल्याचे समजते. भाजपच्या काही आमदारांची कामगिरी समाधानकारक नसल्याने या मतदारसंघांविषयी योग्य निर्णय घ्या, अशा सूचनाही शहा यांनी दिल्याचे कळते.

श्रमहायुतीच्या ज्या जागा हमखास निवडून येणार आहेत त्यांचा लवकरात लवकर आढावा घेऊन एकत्रित बैठका घेण्याच्या सूचनाही शहा यांनी दिल्या असून, लवकरात लवकर जागावाटप करून निवडणुकीच्या प्रचाराला लागण्यास शहा यांनी सांगितले आहे.

भाजपचे जागावाटपाचे सूत्र शिंदेंना अमान्य

मुंबई : महायुतीमधील जागावाटपासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. भाजपला 160, तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट प्रत्येकी 64 असे सूत्र भाजपकडून प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे सूत्र मान्य नाही. लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट महायुतीत सर्वाधिक राहिला आहे. त्यामुळे शिंदे किमान 80 जागांसाठी आग्रही आहेत.

महायुतीच्या प्रत्येक घटकपक्षाने आपल्या कोट्यातून मित्रपक्षांना जागा सोडाव्यात, असे सूत्रही मांडण्यात आले आहे. त्यामुळे शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर महायुतीच्या नेत्यांची पुढील बैठक दिल्लीत पार पडणार असल्याचे समजते. महायुतीच्या जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब हे दिल्लीतच होणार आहे.

अमित शहांच्या दौर्‍यात अजित पवारांची दांडी

मुंबईत गणेश दर्शन आणि इतर कार्यक्रमांसाठी आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्‍याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी गणेश दर्शनासाठी आलेल्या शहा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अजित पवार तेथेही आले नाहीत. त्यामुळे चर्चेला उधाण येताच अजित पवार यांनी दिल्लीला निघालेले शहा यांची विमानतळावर जाऊन भेट घेत चर्चा थोपविण्याचा प्रयत्न केला.

बारामतीत मुक्कामाला असलेले अजित पवार रविवारी मुंबईत आले होते. त्यामुळे ते शहांना भेटणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात चर्चा होती. मात्र, सोमवारी दिवसभर ते शहांसोबत दिसले नाहीत. यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्यामुळे त्यांनी परतीच्या वाटेवर असलेल्या शहा यांची विमानतळावर भेट घेतली व महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे दर्शविले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT