सातार्‍यात सवाद्य मिरवणुकीला परवानगी नाकारल्यास बहिष्कार

मंडळांचा पवित्रा; विसर्जनादिवशी मंडपातच मूर्ती ठेवणार
Satara News
सातारा : मंडईचा राजा गणेश मंडळात आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना कार्यकर्ते.Pudhari Photo
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा

राज्यात कुठेही मिरवणूक बंदीबाबत शासनाने नियमावली लागू केलेली नाही. तरीही सातार्‍यात प्रशासन दांडगाई करत आहे. प्रशासनाने विसर्जनादिवशी सवाद्य मिरवणुकीला परवानगी नाकारली तर मिरवणुकीवर बहिष्कार टाकला जाईल, तसेच गणेशमूर्ती मंडपातच ठेवल्या जातील, असा इशारा सातार्‍यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दिला आहे. दरम्यान, बैठकीनंतर मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांना निवेदन देऊन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

Satara News
गणपती बाप्पा म्हटल्यावर ‘मोरया’च का म्हणतात?

येथील मंडईचा राजा गणेशोत्सव मंडळामध्ये सोमवारी सायंकाळी सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व व्यापारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी नगराध्यक्ष अशोक मोने, सागर पावसे, पंकज चव्हाण, अ‍ॅड. गोकुळ सारडा, अभिजित बारटक्के, सनी साळुंखे, चंद्रशेखर घोडके, महेश साळुंखे, अक्षय गवळी, अतुल चव्हाण, प्रतिक मोहिते, प्रलय शेटे, भूषण गोळे, अ‍ॅड. शार्दूल टोपे, शेखर चव्हाण आदींची उपस्थिती होती. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि शहरातील व्यापारी यांच्यात गणेश आगमन मिरवणुकांच्या निमित्ताने दरी पडल्याचे समोर आले होते. काही व्यापार्‍यांनी मिरवणुकांबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यावरुन गणेश मंडळांचे कार्यकर्ते व्यापार्‍यांबाबत संताप व्यक्त करत होते. या पार्श्वभूमीवर या बैठकीला खूप मोठे महत्व होते. या बैठकीमध्ये व्यापारी आणि गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांच्यातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न झाला.

Satara News
श्री गणेश दर्शन | नाशिकचा नवसाला पावणारा 'नवश्या गणपती'

अशोक मोने म्हणाले, सातारा शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीची मोठी परंपरा आहे. त्यामुळे ही परंपरा आपण अबाधित राखूया. गणेश मूर्ती आगमनाला व्यापार्‍यांनी विरोध केला नव्हता. व्यापारी पेठांमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी मायभगिणी आलेल्या होत्या. त्यांना त्रास होऊ नये, या हेतूने व्यापारी मागणी करत होते. डीजे वाजवल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. आता मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्ये प्रशासनाने ठरवून दिलेल्या डेसिबलमध्येच वाजवावीत. रात्री 12 पर्यंत मिरवणूक आटोपती घ्यायची आहे. मात्र, मिरवणुकीला सवाद्य परवानगी नाकारली तर गणेश मंडळातून मूर्ती हलवल्या जाणार नाहीत. वाद्यांना मिरवणुकीत विरोध करणार्‍या प्रशासनाचा निषेध नोंदवत गणेश मूर्ती वेळ पडल्यास रस्त्यावर ठेवू. खा. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून मंळवारी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांना निवेदन दिले जाणार आहे.

चंद्रशेखर घोडके म्हणाले, वीज महामंडळ गणेश मंडळांकडून व्यावसायिक पध्दतीने बिले आकारत आहे. ही वीज निम्म्या दरात द्यावी, यासाठी मंगळवारी वीज महामंडळाच्या अधिकार्‍यांना निवेदन दिले जाणार आहे.पंकज चव्हाण म्हणाले, मिरवणूक बंदीबाबत राज्यशासनाची कोणतीही नियमावली नाही. त्यामुळे प्रशासनाला मिरवणुकीसाठी परवानगी नाकारता येणार नाही.अभिजित बारटक्के म्हणाले, सातारा शहरात वाजत-गाजत गणेशमूर्ती आणण्याची परंपरा होती. वास्तविक, नेहमीप्रमाणे प्रशासनाने गणेश मंडळांची बैठक घेतलेली नाही. त्यामुळे भोंगळ कारभार उघडकीस आलेला आहे.

दरम्यान, स्पिक व डॉल्बीतील फरक प्रशासनाने स्पष्ट करावा, लेझर बंदी असली तरी शार्पीला मंजुरी द्यावी, त्याला प्रशासन का नकार देत आहे? असे प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केले. 12 वाजता वाद्ये बंद होतात. मात्र, त्यानंतर मिरवणूक सुरु असताना पोलिस दांडगाईने कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करुन मिरवणूक पांगवण्याचा प्रयत्न करतात. पोलिस प्रशासनाने असे करु नये, उंच गणेशमूर्तींसाठी एमएसईबीमार्फत वायर्स उचलून द्याव्यात, सर्व गणेशोत्सव मंडळांवरील पूर्वीचे गणेशोत्सव काळातील पूर्वीचे गुन्हे लवकर निकाली काढावेत, व्यापार्‍यांच्या ठरावीक लोकांच्या निवेदनावर प्रशासनाने कितपत ऐकावे, अशा भावना मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांची एक कमिटी नेमण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीमध्ये शिवतेज गणेशोत्सव मंडळ, बुधवार पेठ, राजमुद्रा मंडळ, नवरत्न गणेशोत्सव मंडळ, करंजे पेठ, करंज्याचा राजा मंडळ, न्यू हनुमान मंडळ, गुरुवार पेठ सातारचा राजा, साउंड संघटना, साई गणेशोत्सव मंडळ मल्हार पेठ आदी मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी मते मांडली. दरम्यान, विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रशासनाने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर केसेस टाकल्या तर त्या केसेस मी कुठलीही फी न आकारता लढणार आहे, असा शब्द अ‍ॅड. गोकुळ सारडा यांनी यावेळी दिला. सातारा शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीची परंपरा खंडित पडू देणार नाही. खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली विसर्जन मिरवणुकीला परवानगी मिळवल्याशिवाय राहणार नाही. सातारकर मोठे की प्रशासन ते आम्ही दाखवून देऊ, असा इशारा माजी नगराध्यक्ष अशोक मोने यांनी यावेळी दिला.

Satara News
Moreshwar Morgav : डोळ्यांत व बेंबीत हिरे बसवलेला अष्टविनायकांपैकी पहिला गणपती

डेसिबलची मर्यादा राखावी : खा. उदयनराजे

शहरातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते बैठक आटोपल्यानंतर सोमवारी रात्री जलमंदिर येथील निवासस्थानी खा. उदयनराजे भोसले यांना भेटले. त्यांनी राजेंच्या पुढे प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली. या पदाधिकार्‍यांच्या भावना समजून घेतल्यानंतर खा. श्री.छ. उदयनराजे म्हणाले, न्यायालयाने आवाजाची मर्यादा घालून डॉल्बीला परवानगी दिली आहे. पुणे, मुंबईत परवानगी असतानासातार्‍याला वेगळा नियम का याबाबत मी जिल्हा पोलिस प्रमुखांशी बोललो आहे. पोलिसांनी रात्री 12 वाजता मिरवणुका बंद करु नयेत. मंडळांनी डेसिबलची मर्यादा राखून डॉल्बी वाजवावी. लोकांच्या डोळ्यांना त्रास होत असल्याने लेझर वापरु नका. सातार्‍यात उत्सवाची चांगली परंपरा आहे. पोलिसांनीही युपी, बिहार प्रमाणे कार्यकर्त्यांना वागणूक देवू नये. पोलिसांनी नागरिकांचा विचार करावा. विनाकारण कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज घडला तर खपवून घेणार नाही, अशा शब्दात खा. उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला सुनावले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news