TET  Pudhari
मुंबई

MAHA TET result 2026: महाटीईटीचा अंतिम निकाल जाहीर; 4.75 लाखांपैकी केवळ 11.28 टक्के उमेदवार पात्र

यंदा पहिल्यांदाच 11 टक्क्यांहून अधिक यश; इंग्रजी व गणित-विज्ञान विषयातील कमी निकालामुळे शिक्षक उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षक भरतीसाठी महत्त्वाची असलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) चा अंतिम निकाल जाहीर झाला असून, राज्यातील अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. या परीक्षेत दोन्ही पेपर मिळून एकूण 4 लाख 75 हजार 669 उमेदवार बसले होते. यापैकी केवळ 50 हजार 369 उमेदवार पात्र ठरले असून, एकूण निकाल 11.28 टक्के इतका कमी लागला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सेवेत असलेले शिक्षक मोठ्या प्रमाणात पात्र ठरत असल्याने पुढील शैक्षणिक वर्षात शिक्षकांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. इंग्रजी माध्यम तसेच गणित-विज्ञान विषयातील कमी यशदरामुळे शिक्षकांच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून टीईटी परीक्षेचा निकाल सुमारे 3.5 टक्क्यांपर्यंत लागत होता. मात्र, यंदा तो 11 टक्क्यांहून अधिक गेला आहे. म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात सुमारे 7 ते 8 टक्क्यांची वाढ झाली आहे. तुलनात्मकदृष्ट्या, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा (सीटीईटी) चा निकाल 20 ते 30 टक्क्यांपर्यंत लागतो. यावर्षी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोन टप्प्यांत परीक्षा घेण्यात आली होती. प्राथमिक शिक्षक पात्रतेसाठी असलेल्या पेपर 1 साठी 2 लाख 3 हजार 334 उमेदवार नोंदणीकृत होते. त्यापैकी 1 लाख 90 हजार 901 उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला बसले. मात्र, यामधून केवळ 21 हजार 892 उमेदवार उत्तीर्ण झाले, तर 1 लाख 68 हजार 993 उमेदवार अपयशी ठरले. पेपर 1 चा अंतिम निकाल 11.47 टक्के इतका लागला. उच्च प्राथमिक शिक्षक पात्रतेसाठी असलेल्या पेपर 2 मध्ये 2 लाख 72 हजार 335 उमेदवार नोंदणीकृत होते. त्यापैकी 2 लाख 55 हजार 829 उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले. मात्र, या पेपरमध्येही यशाचे प्रमाण समाधानकारक राहिले नाही. केवळ 28 हजार 477 उमेदवार पात्र ठरले असून, 2 लाख 27 हजार 332 उमेदवार नापास झाले. पेपर 2 चा निकाल 11.13 टक्के इतका नोंदवण्यात आला. माध्यमनिहाय निकाल पाहता पेपर 1 मध्ये मराठी माध्यमाचा निकाल 12.02 टक्के लागला. मराठी माध्यमातून 1 लाख 34 हजार 680 उमेदवार परीक्षेला बसले होते. याखालोखाल हिंदी माध्यमाचा निकाल 12.19 टक्के, तर कन्नड माध्यमाचा निकाल 15.01 टक्के इतका लागला. मात्र इंग्रजी माध्यमाचा निकाल केवळ 5.44 टक्के, तर गुजराती माध्यमाचा निकाल 3.70 टक्के इतका अत्यल्प राहिला. पेपर 2 (गणित व विज्ञान) च्या निकालात हिंदी माध्यमाने आघाडी घेतली असून, या माध्यमाचा निकाल 17 टक्के लागला आहे.

मराठी माध्यमाचा निकाल 8.29 टक्के, इंग्रजी माध्यमाचा 5.87 टक्के, तर उर्दू माध्यमाचा निकाल 3.34 टक्के इतका कमी राहिला. या पेपरसाठी एकूण 1 लाख 1 हजार 794 उमेदवार नोंदणीकृत होते. त्यापैकी केवळ 8 हजार 737 उमेदवार पात्र ठरले. पेपर 2 (सामाजिकशास्त्र) च्या निकालातही हिंदी माध्यम आघाडीवर राहिले.

हिंदी माध्यमाचा निकाल 22.29 टक्के लागला असून, हा सर्वाधिक आहे. मराठी माध्यमाचा निकाल 9.81 टक्के, इंग्रजी माध्यमाचा 6.20 टक्के, तर उर्दू माध्यमाचा निकाल 3.33 टक्के इतका नोंदवण्यात आला.

या विषयात 1 लाख 70 हजार 541 उमेदवारांपैकी 19 हजार 740 उमेदवार पात्र ठरले. पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद तसेच शिक्षण निरीक्षक (माध्यमिक) कार्यालयांमार्फत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिली आहे.

दरम्यान, पहिल्या पेपरमधील परीसर अभ्यास विषयातील चारही संचामधील एक प्रश्न रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

यंदा पहिल्यांदाच 11 टक्क्यांहून अधिक उमेदवार उत्तीर्ण

परीक्षा परिषदेने 2013 पासून एकूण आठ वेळा टीईटी परीक्षा घेतली. तसेच परीक्षा दिलेल्या 29 लाख 74 हजार 600 उमेदवारांपैकी 1 लाख 6 हजार 663 उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यामुळे टीईटीमध्ये पात्र ठरण्याचे सरासरी प्रमाण 3.5 टक्के आहे. आतापर्यंत सर्वाधिक निकाल 2018 मध्ये 5.13 टक्के, त्यापूर्वी 2013 मध्ये 5.02 टक्के लागला होता. बाकी सर्व परीक्षांचा निकाल 2.3 टक्के ते 3.70 टक्के या दरम्यान आहे. तर 2018 आणि 2019 या वर्षीच्या परीक्षांतील गैरप्रकारांमध्ये सहभाग असलेल्या 9 हजार 537 उमेदवारांची संपादणूक रद्द करण्यात आली आहे. दरम्यान यंदा पहिल्यांदाच 11 टक्क्यांहून अधिक उमेदवार उत्तीर्ण झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

असा आहे निकाल

पेपर एक

हजर 190901

गैरहजर 12433

उत्तीर्ण 21892

अनुत्तीर्ण 168993

राखीव निकाल 16

एकूण 203334

निकालाचा टक्का 11.47

पेपर दोन

हजर 255829

गैरहजर 16506

उत्तीर्ण 28477

अनुत्तीर्ण 227332

राखीव निकाल 20

एकूण 272335

निकालाचा टक्का 11.13

माध्यमनिहाय एकूण निकाल

माध्यम नोंदणीकृत बसलेले उत्तीर्ण

मराठी 3,27,135 3,06,608 32,129

हिंदी 92,420 87,975 15,232

इंग्रजी 28,437 25,984 1,515

उर्दू 25,935 24,557 1,314

कन्नड 1,468 1,372 160

बंगाली 168 156 16

गुजराती 75 62 2

तेलुगू 30 16 1

सिंधी 1 0 0

एकूण 4,75,669 4,46,730 50,369

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT