

Sujat Ambedkar on firecrackers
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी 'एक्स' पोस्ट करत "फटाके फोडल्यास सभा घेणार नाही", अशा शब्दांमध्ये कार्यकर्त्यांना खडसावले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी आपल्या 'एक्स' पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे राज्यात दुखावटा असताना कोणत्याही सभा-कार्यक्रमात फटाके फोडणे किंवा फुले उधळणे हे योग्य नाही आणि मी त्याचा स्वीकारही करणार नाही.
फुले उधळणे व फटाके फोडणे हे आपल्या फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीशी सुसंगत नाही. यापुढे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे की, वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही कार्यक्रमात हारतुरे, फुलांची उधळण किंवा फटाके वापरले गेल्यास संबंधित सभा तात्काळ रद्द करण्यात येईल, असा इशाराही सुजात आंबेडकर यांनी दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात अधिकृत पत्रकाद्वारे सूचना दिलेल्या आहेत. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करून जर कुठेही हारतुरे, फुलांची उधळण किंवा फटाके वापरले गेले, तर त्या ठिकाणची सभा पक्षाच्या आदेशानुसार रद्द करण्यात येईल, असेही सुजात आंबेडकर यांनी आपल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.