LPG Cylinder Price Hike Pudhari
मुंबई

LPG Cylinder Price Hike: आखाती युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस 60 रुपयांनी महाग, व्यावसायिक सिलिंडर 114 रुपयांनी वाढ

इराण-इस्रायल संघर्षामुळे इंधन वाहतूक विस्कळीत; उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांनाही बसणार फटका

पुढारी वृत्तसेवा

मुंबई/नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे इंधन वाहतूक विस्कळीत झाल्याने सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर (एलपीजी) दरात शनिवारी 60 रुपयांनी, तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 114.5 रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ त्वरित लागू झाली.

युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा (19 किलो) पुरवठा थांबविण्यात आला आहे. आता घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (14.2 किलो) दरात 60 रुपयांनी वाढ झाली असून, दिल्लीतील सिलिंडरचा दर 913 रुपयांवर गेला आहे. मुंबईत एका सिलिंडरची किंमत 115 रुपयांनी वाढल्याने मुंबईकरांना आखाती युद्धाचा पहिला झटका बसला. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या (आयओसी) संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे. उज्ज्वला योजनेत देशातील 10 कोटी लोकांना कमी किमतीत सिलिंडर मिळतो. त्यांनाही या वाढीची झळ बसेल. उज्ज्वलाच्या लाभार्थ्यांना 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरसाठी आता 613 रुपये मोजावे लागतील. त्यानंतर त्यांना वर्षाला 12 सिलिंडरसाठी प्रत्येकी 300 रुपयांचे अनुदान मिळेल.

मुंबईत एलपीजीचा दर 912 रुपये

मुंबईतील घरगुती एलपीजीचा दर 912.50, कोलकाता 939 आणि चेन्नईत 928.50 रुपये दर असल्याचे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. गेल्या वर्षभरात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात झालेली ही दुसरी दरवाढ आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली होती.

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा वापर प्रामुख्याने हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये केला जातो. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर (19 किलो) चे दर 114.5 रुपयांनी वाढून 1,883 रुपयांवर गेले आहेत. विशेष म्हणजे, व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 1 मार्चपासून 28 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात यावर्षी तब्बल 302.50 रुपयांनी वाढ झाली आहे.

मुंबईत एका व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता 1835 रुपये असेल. मात्र, ही किंमत मोजूनही व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा होईलच याची खात्री नाही.

गॅसची दरवाढ आणि व्यावसायिक गॅसची टंचाई यातून आता हॉटेलातील अन्न पदार्थांचे दरही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT