नवी मुंबई: राजेंद्र पाटील
इराण,इस्रायल युद्धाचा मोठा परिणाम शेतमालासह कोकण हापूस आंब्याच्या निर्यातीवर जाणवायला सुरुवात झाली आहे. दरवर्षी 30 ते 35 टक्के हापूसची निर्यात होते. निर्यात कमी झाल्यास बाजारात आंब्याचा साठा वाढण्याची शक्यता असून त्यामुळे दर मोठ्या प्रमाणात कोसळण्याची भीती आहे.
इराणने आयात,निर्यातीचे प्रवेश बंद करून पूर्ण आयात-निर्यातच थांबली असल्याने आता युद्ध थांबणे हाच यावर पर्याय असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
रमजान महिन्यात द्राक्ष,पपई,खजूर,यांसह केळी,खरबुजा यांसारख्या फळांना खूप मागणी असते,मात्र युद्धामुळे ही फळे बाजारात उपलब्ध होत नसल्याने बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.
कोकण हापूसची निर्यात थांबली तर त्याचा परिणाम थेट विक्रीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या देवगडचा हापूस आंबा वाशी येथील घाऊक बाजारात दाखल झाला आहे. मुंबई एपीएमसीत 5 हजार ते 10 हजार रुपये पेटीचा दर आहे. 15 मार्चपासून हापूसची आवक सुरू होईल. निर्यात थांबल्याने कोकण हापूसची 20 ते 25 टक्के आवक आता मुंबई एपीएमसीत होईल. यामुळे बाजारात हापूस स्वस्त दरात विकला गेला, तर कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यातच हापूसच्या उत्पादनात यंदा मोठी घट झाली आहे.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात हापूस आंबा आखाती देशांमध्ये पाठवला जातो. मात्र, सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीवर पूर्ण बंदी आहे. जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर त्याचा फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. निर्यात कमी झाल्यास बाजारात आंब्यांचा साठा वाढण्याची शक्यता असून त्यामुळे दरांवरही परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, निर्यात कमी झाल्यास चांगल्या दर्जाचा हापूस आंबा स्थानिक बाजारात अधिक प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने खवय्यांना यंदा उत्तम दर्जाचा आंबा चाखण्याची संधी मिळू शकते. जेएनपीए बंदरात मालाने भरलेले हजारो कंटेनर पडून आहेत.
माल सडून जाण्याच्या भीतीने तोच माल आता नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात विकण्यासाठी आणला जात आहे. मात्र आखाती देशात लाखो रुपयांना निर्यात होणारा माल आता कवडीमोल भावाने स्थानिक बाजारात विकला जात असल्याने याचा थेट फटका व्यापाऱ्यांसोबत शेतकऱ्यांनाही बसत आहे,अशी माहिती घाऊक व्यापारी आणि एपीएमसीचे संचालक संजय पानसरे यांनी दिली.